बेळगावातील क्रिकेट स्टेडियम, स्पोर्ट्स सेंटरची पाहणी करण्यासाठी आणि उर्वरित टप्प्यातील जी विकास कामे बाकी आहेत त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे (केएससीए) अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज मंगळवारी सकाळी ऑटोनगर येथील केएससीए क्रिकेट स्टेडियम व मैदानाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
1983 साली सर्वाधिक 18 बळी घेऊन भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या खेळाडूंमध्ये आघाडीवर राहिलेले माजी अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे धारवाड क्रिकेट विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार यांनी स्वागत केले. आपल्या या भेटीप्रसंगी रॉजर बिन्नी यांनी स्टेडियममधील सर्व विभाग, स्पोर्ट्स सेंटर आणि तेथील उपलब्ध सुविधांची पाहणी केली.
त्याचप्रमाणे संपूर्ण मैदानाची विशेष करून खेळपट्टीची पाहणी करून बिन्नी यांनी समाधान व्यक्त केले. तसेच स्टेडियममधील उर्वरित टप्प्यातील जी विकास कामे बाकी आहेत त्याचा पाठपुरावा करून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
रॉजर बिन्नी यांनी ऑटोनगर येथील क्रिकेट स्टेडियमला दिलेल्या भेटीप्रसंगी अविनाश पोतदार यांच्यासह कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अन्य पदाधिकारी तसेच धारवाड क्रिकेट विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. हुबळी व बेळगावातील स्टेडियमच्या प्रकल्पांबाबत केएससीए महत्त्वकांक्षी राहिली असून या पार्श्वभूमीवर आजची रॉजर बिन्नी व त्यांच्या पथकाची भेट विशेष महत्त्वाची ठरली आहे.
दरम्यान, बेळगाव व हुबळी येथील क्रिकेट मैदान, स्पोर्ट्स सेंटर प्रकल्प साधारणपणे 40 ते 50 कोटी रुपये खर्चाचा आहे. आटोनगर बेळगाव येथील स्टेडियम येत्या ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत पूर्ण सुसज्ज करून ते सर्वसामान्यांत करता खुले करण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न असतील असे धारवाड विभाग समन्वयक अविनाश पोतदार यांनी सांगितले आहे.