बेळगाव महापालिकेसमोर अनाधिकृत लाल-पिवळा ध्वज उभारणे, शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या गाडीवर हल्ला करणे आदी उपद्व्याप करून अशांतता निर्माण केल्यानंतर आता कन्नड संघटनांनी बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करा, अशी कोल्हेकुई सुरू केली आहे.
कन्नड संघटनांच्या क्रिया समितीने बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करावे, अशी मागणी केली आहे. तसेच यासंदर्भात लाल -पिवळा झेंडा फेम श्रीनिवास ताळुकर याच्याप्रमाणे कन्नड संघटनेचे नेते अशोक चंदरगी याच्या नेतृत्वाखाली कन्नड संघटनांच्या क्रिया समितीतर्फे सोमवारी सकाळी जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले.
शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या ज्या वाहनाच्या फलकाची मोडतोड करण्यात आली ते वाहनाच जप्त करावे. त्याचप्रमाणे बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय बंद करावे.
महाराष्ट्रात कन्नड फलक लावले जावेत यासाठी कन्नड संघटना प्रयत्नशील असताना शिवसेनेतर्फे बेळगावसह सीमाभागात कर्नाटक विरोधी उपक्रम राबविले जात आहेत यासाठी बेळगावातील शिवसेनेचे कार्यालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली जाऊ नये.
हे कार्यालय तात्काळ बंद केले जावे, अशी मागणी यावेळी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली.