कळसा-भांडुरा नाला विचलन प्रकल्पासाठी सरकारकडून 1,677 कोटी रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस येडियुरप्पा यांनी दिली आहे.
कळसा-भांडुरा नाला विचलन प्रकल्पासाठी सरकारने एक हजार 677 कोटी रुपये खर्चाच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी नेमका किती निधी खर्च केला जाणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व प्रमुख जलसिंचन प्रकल्पांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची आपली वचनबद्धता लक्षात घेऊन राज्य सरकारने जलसंसाधन विभागाला 21,181 कोटी रुपये मंजूर केले आहेत. मागील आर्थिक वर्षात या कामासाठी 21,308 कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले होते.
यत्तीनहोळी पेयजल प्रकल्पाअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या उपसा जलसिंचन योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण होत आले आहे. उत्तर कर्नाटकातील काही दुष्काळी भागातील पिण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी या प्रकल्पासाठी बेडथी -वरदा नदीपात्रातून 22 टीएमसी फूट पाणी वापरले जाणार आहे.
अप्पर भद्रा प्रकल्पाला “राष्ट्रीय प्रकल्प” म्हणून घोषित करावे या मागणीचा प्रस्ताव केंद्राच्या गुंतवणुक मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी 21,474 कोटी रु. (सुधारित अंदाज) खर्चाला प्रशासकीय परवानगी देण्यात आली आहे.
अप्पर कृष्णा प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीसाठी सरकार प्राधान्याने आवश्यक संसाधने पुरवणार आहे. तसेच कृष्णा भाग्य जल निगमला जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यासाठी 5,600 कोटी रु. मंजूर करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिली.