कर्नाटकचे जलसंपदा मंत्री यांच्याविरोधात सुरु असलेल्या सीडी प्रकरणाची दाद गृहमंत्र्यांनी घेतली असून, या प्रकरणाची चौकशी आणि अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची सूचना दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजीपी सौमेंदू मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
‘सीडी’ प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. या प्रकरणी जलसंपदामंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गृहमंत्री बसवराज बोम्मई यांनी शहर पोलीस आयुक्त कमल पंत यांना पत्र लिहून आयपीएस अधिकारी, आयजीपी सौमेंदू मुखर्जी यांना एसआयटी प्रभारी म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी रमेश जारकीहोली यांनी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा आणि गृहमंत्री यांच्याशी भेटून चर्चा केली होती. दरम्यान आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांची आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी बोम्मई यांना या विषयी चर्चा करण्याचे निर्देश दिले होते. यापूर्वी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी या प्रकरणी गृहमंत्री योग्य निर्णय घेतील, असे सांगितले होते.
रमेश जारकीहोळी यांनी कब्बन पार्क येथील पोलीस स्थानकात दिलेल्या याचिकेत आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले असून बदनाम करण्याच्या हेतूने आपल्याविरूद्ध कट रचल्याचे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर बंगळूर शहर पोलिस आयुक्तांना गृहमंत्र्यांनी पात्र लिहिले असून रमेश जारकीहोळी यांनी दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात आयजीपी सौमेंदू मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेष तपास पथक स्थापन करून पुढील कार्यवाहीसाठी पूर्ण अहवाल सरकारकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.