राज्यातील अश्लिल सीडी प्रकरण अद्यापही गाजत असून त्याबाबत अनेक तर्कवितर्क पुढे येत आहेत. दरम्यान सीडी प्रकरणाशी संबंधित युवतीने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना इंग्रजीमध्ये तीन पानाचे पत्र पाठवून रमेश जारकीहोळी हे डीवायएसपी कट्टीमणी आणि एसआयटीच्या मदतीने माझ्या कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणत असून माझे अपहरण झाल्याचे वृत्त पूर्णतः निराधार आहे असे स्पष्ट केले आहे.
राज्यातील अश्लिल सीडी प्रकरणाला आता एक ताजे नवे वळण लागले असून सीडीतील संबंधित युवतीने या प्रकरणातील आरोपी रमेश जारकीहोळी यांच्या संगनमताने डीवायएसपी कट्टीमणी आणि एसआयटी आपल्या कुटुंबियांवर दबाव आणत आहेत, असा आरोप करण्याबरोबरच याप्रकरणी उच्च न्यायालयाने मध्यस्थी करावी अशी लेखी विनंती मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना लिहिलेल्या आपल्या तीन पानी पत्रामध्ये संबंधित युवतीने आपल्या अपहरणाचा इन्कार करताना माझे अपहरण झाले असे सांगण्यासाठी माझ्या आई -वडिलांवर दबाव आणण्यात आला आहे असे नमूद केले आहे. डीवायएसपी कटीमनी हे आमच्या कुटुंबावर दबाव आणत आहेत ते रमेश जारकीहोळी यांच्यावतीने कार्यरत असून न्यायालयाने माझ्या कळकळीच्या विनंतीचा गांभीर्याने विचार करावा. मला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयाने राज्य सरकारला सहकार्य करण्याची सूचना द्यावी.
*मी बलात्कार पीडित*
मी बलात्कार पीडित असून त्यासाठी कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध कब्बन पार्क पोलीस स्टेशन बेंगलोर येथे मी तक्रार (एफआयआर 30 /221) नोंदविली आहे. याप्रकरणी भादंवि कलम 354, 506, 504, 376 (सी), 417 आणि आयटी कायद्याच्या कलम 67 (ए) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रमेश जारकीहोळी हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत आणि त्यांनी आतापासूनच पुरावे नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. ते जाहीररित्या मला धमकावत असून कोणत्याही क्षणी कोणतेही टोक गाठू शकतात. मी तपास पथकाशी संपर्क साधू नये यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न सुरू केले आहेत. इतकेच नव्हे तर रमेश जारकीहोळी यांनी एसआयटीच्या माध्यमातून आपल्या पालकांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. तुमच्या मुलीला तक्रार दाखल करून न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यापासून परावृत्त करा असे ते सांगत आहेत.
*आत्मसन्मानासाठी लढणार*
माझ्या जिवाला धोका असून कोणत्याही वेळी कांहीही विपरीत घडण्याची शक्यता मला दिसते आहे. परंतु मी माझ्यावरील अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढाई लढणार आहे. कारण मी यामध्ये भरडले गेली आहे. माझ्या प्रतिष्ठेसाठी आणि आत्मसन्मानासाठी मी लढा देणार आहे. माझे अपहरण झाल्याचे वृत्त निराधार आहे, असेही त्या युवतीने आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.