फेसबुक फ्रेंड्स सर्कलने युद्धपातळीवर केलेल्या हालचाली आणि त्यांना संदेश डोण्यांनावर या रक्तदात्याने तितक्याच तत्परतेने केलेल्या सहकार्यामुळे तातडीने रक्ताची गरज असलेल्या एका रुग्ण महिलेचे प्राण वाचल्याची घटना आज बुधवारी घडली.
याबाबतची माहिती अशी की, उषा व्ही. यलक्कीशेट्टर या आजारी महिलेला गेल्या 7 मार्च रोजी गंभीर अवस्थेत उपचारासाठी केएलई हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उषा यांना तातडीने बी -पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. यासंदर्भात रुग्ण महिलेच्या पतीने आपल्या आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या मोबाईल क्रमांकासह हॉस्पिटलमधील वाॅर्ड आणि रूम नंबर नमूद करून सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. ही बाब निदर्शनास येताच फेसबूक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी काल सकाळी त्वरेने केएलई हॉस्पिटलकडे धाव घेतली.
त्यावेळी उषा यांच्या शरीरातील रक्त पेशींचे प्रमाण 1 हजारावर घसरल्याचे म्हणजे अत्यंत कमी झाल्यामुळे त्या मरणोन्मुख अवस्थेत पोहोचल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
तेंव्हा दरेकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदत कार्य हाती घेतले. त्यांनी बी -पॉझिटिव्ह रक्तदाता असणारे सिद्धेश्वर गल्ली येळ्ळूर येथील आपले मित्र संदेश डोण्यांनावर यांना आणण्यासाठी गणेश रोकडे यांच्या रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. निकडीचा प्रसंग ओळखून संदेश यांनी कामावर न जाता रुग्णवाहिकेतून हॉस्पिटल गाठले. तसेच तातडीने रक्तदान केल्यामुळे उषा यलक्कीशेट्टर यांचे प्राण वाचू शकले. संदेश डोण्यांनावर हे पार्वतीनगर, उद्यमबाग येथील ओम इंजिनिअरिंगमध्ये कामाला आहेत.
आज रक्तदानामुळे त्यांना कामावर जाता आले नसले तरी आपल्यामुळे एकाचे प्राण वाचले याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. दरम्यान, याबद्दल फेसबुक फ्रेंड्स सर्कलने ओम इंजिनिअरिंग या प्रतिष्ठित उद्योग संस्थेचे देखील आभार मानले आहेत.