खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या सांबरा, निलजी, मुतगा, मुचंडी परिसरातील शेतकऱ्यांनी आज सकाळी सादर केलेल्या निवेदनाची दखल घेऊन हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता चिकार्डे यांनी उद्या मंगळवारपासून सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
खंडित वीज पुरवठ्यामुळे हैराण झालेल्या सांबरा, निलजी, मुतगा, मुचंडी परिसरातील शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता चिकार्डे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
हालगा हेस्कॉम सेक्शन ऑफिसच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सांबरा, निलजी, मुतगा, मुचंडी आदी भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत वीजपुरवठा केला जात आहे. मात्र या कालावधीत वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्यामुळे शेतीच्या कामात अडथळा निर्माण होत होता.
त्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी आज नागेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता चिकार्डे यांची भेट घेऊन तक्रार मांडली. यावेळी नागेश देसाई यांनी खंडित वीज पुरवठाबद्दल चिकार्डे यांना धारेवर धरले. तसेच वर्षातील या दोन -तीन महिन्यात शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याची अत्यंत गरज असते. या कालावधीत वीज पुरवठा खंडित करणे किती चुकीची आहे हे चिकार्डे यांच्या निदर्शनास आणून दिले.
नागेश देसाई आणि उपस्थित शेतकऱ्यांची म्हणणे ऐकून घेऊन कार्यकारी अभियंता चिकार्डे उद्या मंगळवार पासूनच सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत संबंधित भागाला सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन सादर करतेवेळी वसंत पाटील, भरमा गोमानाचे, मधु मोदगेकर, दऱ्याप्पा चौगुले आदींसह सांबरा, निलजी, मुतगा, मुचंडी भागातील शेतकरी उपस्थित होते.