फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांच्या प्रयत्नामुळे हेल्प फाॅर नीडीच्या माध्यमातून आज सोमवारी सकाळी सिव्हिल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या कोविड वाॅर्ड समोरील परिसर श्रमदानाने स्वच्छ करण्यात आला.
सिव्हिल हॉस्पिटल अर्थात बीम्स हॉस्पिटलच्या कोविड वाॅर्ड समोरील परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली होती. वाॅर्ड समोरील आवारात असलेल्या आसन व्यवस्थेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला होता. या ठिकाणी पालापाचोळ्यासह वापरलेले ऑक्सिजन मास्क, सलाईन बाटल्या, दारूच्या बाटल्या, बिसलरी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, खराब पीपीटी किट, टाकाऊ अन्न तिथेच तथा विखरून पडले होते.
सदर बाब फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांच्या निदर्शनास आली. यासंदर्भात त्यांनी हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांच्याशी संपर्क साधला. सदर अस्वच्छते संदर्भात या उभयतांनी बीम्स प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कल्पना देऊन संबंधित परिसर स्वच्छ करण्याची विनंती केली होती. बेळगाव लाईव्हने देखील यासंदर्भात आवाज उठविला होता.
तथापी बीम्स प्रशासन आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे हेल्प फाॅर नीडीच्या सुहानी, ललित शर्मा आदी कार्यकर्त्यांनी आज सुरेंद्र अनगोळकर आणि संतोष दरेकर यांच्या नेतृत्वाखाली बीम्स हॉस्पिटलच्या कोविड वाॅर्ड समोरील परिसर श्रमदानाने स्वच्छ केला. तसेच तेथील केरकचरा, रिकाम्या बाटल्या, टाकाऊ साहित्य आदी एकत्र जमा करून त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली.
याप्रसंगी बोलताना सुरेंद्र अनगोळकर यांनी पुन्हा वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्त्व विशद केले. तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करू नये. त्याचप्रमाणे संबंधित संस्थांच्या प्रशासनाने देखील आपापला परिसर स्वच्छ राहील याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे.