बेळगाव शहरात मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याने सतर्क झालेल्या महापालिकेच्या आरोग्य खात्याने मास्क सक्तीसह दंड आकारणीची मोहीम हाती घेतली आहे.
कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविण्यात आलेला असताना गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यात 51 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बेळगाव शहरातील 18 रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य खात्याने कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीच्या काटेकोर अंमलबजावणीचा आदेश दिला आहे. त्या अनुषंगाने बेळगाव महापालिकेच्या आरोग्य खात्याने सार्वजनिक ठिकाणी फिरणार्या नागरिकांसाठी मास्क परिधान करणे सक्तीचे केले आहे. मास्क परिधान न करता सार्वजनिक ठिकाणी वापरणाऱ्यांना समज देऊन दंड आकारला जात आहे.
त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार, शिवानंद भोसले, कलावती आदीमनी, संजय पाटील, पर्यवेक्षक नितीन देमट्टी, संजय पाटील, सुभाष घराणी आणि किरण देमट्टी यांनी आज बुधवारी शहापूर खडेबाजार परिसरात विना मास्क फिरणाऱ्यांना दंड आकारण्याची मोहीम हाती घेतली होती.