बेळगाव हे गरिबांचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. नेहमीच थंड वातावरण असलेल्या बेळगावचा पारा मात्र मार्च महिन्यातच वाढला आहे. आज बेळगावच्या कमाल तापमानाची नोंद ३७.९ अंश सेल्सियस इतकी नोंदविण्यात आली आहे.
दिवसागणिक बेळगावच्या तापमानात वाढ होत चालली असून अद्याप एप्रिल आणि मे महिन्याच्या आधीच तीव्र उन्हाच्या झळांनी अंगाची लाही होत आहे.
मागील पंधरवड्यात वळिवाने देखील अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसांपासून शहराच्या तापमानात कमालीची वाढ झाली असून दुपारच्या वेळेस रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. रस्त्यावर उन्हाची तीव्रता सहज अनुभवता येत असून नागरिक मात्र उन्हाच्या झळांनी प्रचंड त्रासले आहे.
ठिकठिकाणी रसवंती गृह आणि शीतपेयांच्या वाहनांवर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. घामाच्या धारा, गेल्या चार दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण त्यामुळे येणार मंद वारा आणि उन्हाचे भाजून काढणारे चटके अशी स्थिती बेळगाव जिल्ह्यातील नागरिक पदोपदी अनुभवत आहेत.
बंद ठिकाणी काम करणाऱ्या नागरिकांना भट्टीचा अनुभव येत आहे. बेळगाव जिल्ह्याच्या तापमानात यंदाच्या सर्वात उच्च तापमानाची नोंद झाली आहे. सध्या बेळगावात पोट निवडणुकीची धूम प्रचार सुरू होणार आहे त्यातच वाढत्या गर्मी मुळे प्रचारात देखील कार्यकर्त्यांची दाणादाण उडणार आहे.