लोकसभा पोटनिवडणुकीचा मुहूर्त लागल्यामुळे बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू झाली आहे. आपल्याच तिकीट मिळावे यासाठी तब्बल 70 जणांनी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणुकीची तारीख घोषित होताक्षणी इच्छुक उमेदवारांनी वेगाने हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी यापैकी काहींनी बेंगलोर तर काहींनी थेट नवी दिल्ली गाठली आहे.
कारण बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीसाठी भाजप उमेदवार निश्चित करण्यासाठी उद्या शुक्रवारी दिल्ली येथे महत्त्वाची बैठक होणार आहे. माजी आमदार रमेश कत्ती हे गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे मुक्काम ठोकून आहेत.
भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, एम. बी. जिरली आदी बऱ्याच जणांनी बेळगाव लोकसभा पोटनिवडणूकीचे तिकीट आपल्याला मिळावे यासाठी आपापल्या परीने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे भाजप हायकमांड दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनाच तिकीट देण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.