प्रत्येक देवस्थानाचा एक इतिहास असतो त्याची कांही वैशिष्ट्ये आणि प्रथा असते. तसाच आगळा इतिहास, वैशिष्ट्य आणि प्रथा असणारे देवस्थान म्हणजे बेळगाव शहराची मानाची होळी असणारे कांगली गल्ली येथील श्री होळी कामण्णा देवस्थान होय.
कांगली गल्ली येथील श्री होळी कामण्णा स्थळ देवस्थान हे एक अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. या ठिकाणची होळी ही बेळगाव शहराची मानाची होळी समजली जाते. बेळगाव शहराची मूळ प्रमुख होळी कामण्णा असणाऱ्या या देवस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वर्षभर कोणत्याही दिवशी नारळ वाढवले जात नाहीत.
फक्त होलिकोत्सवा दरम्यान पाच दिवस नारळ वाढवले जातात. जागृत देवस्थान असल्यामुळे वर्षभर जमा झालेले नवसाचे नारळ जमा करून या ठिकाणी मोठे तोरण उभारले जाते. नवसाला पावणारे थळ असल्यामुळे दरवर्षी या ठिकाणी शेकडो नारळ जमा होत असतात. होळी दिवशी लष्टीचा नारळ वाढविल्यानंतर पुढील सलग पाच दिवस तोरणाचे नारळ वाढवून त्यांच्या प्रसादाचे वाटप केले जाते.
पूर्वी बेळगाव शहर हे फक्त 18 गल्ल्यांपुरते मर्यादित होते. त्यावेळी कांगली गल्ली येथील होळी ही शहरातील ‘मानाची होळी’ समजली जायची. होळी दिवशी ही होळी पेटविल्या नंतरच शहरातील इतर होळ्या पेटवल्या जात असत. 18 गल्ल्यांची मानाची होळी असणाऱ्या कांगली गल्ली येथील होळी आणताना दोन होळी आणण्याची प्रथा आहे. जी आजतागायत सुरू आहे. या दोन होळींपैकी एक कांगली गल्लीची असते, तर दुसरी लहान होळी ही कपलेश्वर मंदिराची असते.
पाडव्यादिवशी घट करून होळीची स्थापना केली जाते. कांगली गल्ली येथे श्री होळी कामण्णा आणि ईर अशी दोन थळे आहेत. याची एक कथा अशी आहे की, फार पूर्वी होळी चढवताना हुबळीकर घराण्याचा एक लहान मुलगा अचानक गायब झाला. तो कोठे गेला आहे कोणालाच कळाले नाही. होळी वगैरे झाल्यानंतर त्या बाळासाठी शोधाशोध करण्यात आली. त्यावेळी मागील बाजूस असलेल्या विहीर सदृश्य खड्ड्यामध्ये ते बालक आढळून आले. त्याचवेळी देवीने एकाच्या अंगात येऊन ते आपले बाळ होते असे सांगितले. तेंव्हापासून या ठिकाणी एक श्री होळी कामण्णाचे आणि दुसरे ईराचे अशी दोन पूजास्थाने निर्माण झाली.
दरवर्षी होलिकोत्सवा दरम्यान यापैकी श्री होळी कामण्णा पूजेचा मान पाटील घराण्याला आणि हुबळीकर घराण्याला ईराच्या पूजेचा मान असतो. सालाबाद प्रमाणे यंदादेखील लष्टीचा नारळ फोडून याठिकाणी पूर्वापार प्रथा जपली जात आहे.