मनपासमोर बेकायदेशीर रीतीने फडकविण्यात आलेला अनधिकृत लाल – पिवळा हटविण्यासाठी सोमवार दि. 8 मार्च रोजी पुन्हा एकदा महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक सोमवार (दि. १ मार्च) रोजी आयोजित करण्यात आली होती. येथे झालेल्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी होते.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत उपस्थितांतून लाल पिवळा हटविण्यासाठी तसेच समिती नेत्यांच्या एकिसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावेळी दीपक दळवी यांनी सर्वांची मते जाणून घेऊन महामोर्चा 8 मार्च रोजी आयोजित करण्याचे जाहीर केले. ते पुढे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी एकीसंदर्भात आज मागणी केली आहे. कार्यकर्त्यांचे नुकसान होऊ नये, कार्याला धक्का पोहोचू नये, यासाठी नक्कीच एकी करण्यात येईल. युवा आघाडीच्या नेतृत्वाने आपल्यासमोर एकिसंदर्भात वक्तव्य केले आहे. ही मागणी लक्षात घेऊन प्रत्येक मराठी भाषिकासाठी आपण पुढाकार घेऊ. मनपासमोर अनधिकृतपणे फडकविण्यात आलेला लाल-पिवळा हटविण्यासाठी प्रशासनाला मुबलक वेळ देण्यात आला आहे. परंतु प्रशासनाने म्हणावा तसा सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. परंतु मराठी भाषिकांच्या अस्मितेसाठी येत्या 8 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर पुन्हा एकदा महामोर्चाचे आयोजन करण्यात येईल, असे मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले. 8 मार्च रोजी होणारा महामोर्चा प्रत्येकाने यशस्वीपणे आणि शांततेत पार पाडावा, असे आवाहन दीपक दळवी यांनी केले.
या बैठकीत प्रामुख्याने मनपा समोर फडकविण्यात आलेला लाल – पिवळा हटविण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मागीलवेळी प्रशासनाने ग्रामपंचायत निवडणूक आणि गृहमंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्याचे कारण पुढे करत आयोजिण्यात आलेला माहामोर्चा स्थगित करण्यास सांगितले होते. परंतु त्यानंतर कित्येक अल्टिमेटम देण्यात येऊनही प्रशासनाने लाल-पिवळ्याबाबत कोणतेही पाऊल उचलले नसून केवळ वेळकाढूपणा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
बैठकीच्या सुरुवातीला महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिवेशनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सीमाप्रश्नी मांडलेल्या ठरावाबाबत अभिनंदन व्यक्त करण्यात आले. त्यानंतर समितीच्या दिवंगत नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत मदन बामणे यांनी घटक समित्यांच्या पुनर्रचनेची मागणी केली.
या बैठकीला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, शिवसेना बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, रणजित चव्हाण – पाटील, दत्ता जाधव, यांच्यासह इतर समिती नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1336100923414164/