देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला गेल्या 16 जानेवारी 2021 रोजी प्रारंभ झाला. आता ही मोहीम 1 मार्च 2021 पासून आणखी विस्तृत आणि तीव्र केली जाणार असून प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी ही लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
सर्वसामान्य जनतेसाठी कोरोना लसीकरण 1 मार्च म्हणजे उद्या सोमवारपासून सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना तसेच विविध व्याधींनी ग्रस्त असलेल्या आणि कोरोनाचा अधिक धोका असलेल्या 45 ते 59 वर्षे वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील पुढील 14 ठिकाणी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. बीम्स जिल्हा हॉस्पिटल, जेएनएमसी मेडिकल कॉलेज बेळगाव (मेडिकल कॉलेज), खानापूर जनरल हॉस्पिटल, बैलहोंगल जनरल हॉस्पिटल, सौंदत्ती जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), रामदुर्ग जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), अथणी जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), रायबाग जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), चिकोडी जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), गोकास जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), हुक्केरी जनरल हॉस्पिटल (तालुका हॉस्पिटल), केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अँड एमआरसी प्रायव्हेट हॉस्पिटल बेळगाव, लेक व्ह्यू हॉस्पिटल (प्रायव्हेट हॉस्पिटल), केएलई सेंटीनरी चॅरिटेबल हॉस्पिटल येळ्ळूर रोड (प्रायव्हेट हॉस्पिटल). उपरोक्त ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी 250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. यामध्ये 100 रुपये सेवाशुल्क आणि 150 रुपये भारत सरकारच्या निर्दिष्ट खात्यात जमा होणार आहेत.
दरम्यान खाली दिलेल्या निकषाच्या आधारे 45 ते 59 वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस दिली जाईल. गेल्या वर्षभरात हृदयविकारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, हृदय प्रत्यारोपण अथवा हृदयासंबंधी शस्त्रक्रिया, मध्यम अथवा तीव्र स्वरूपाचा हृदयाच्या झडपांचा आजार आदी हृदयासंबंधी तक्रारी असणाऱ्या व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती, श्वसनाच्या आजाराने गेल्या दोन वर्षात हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या व्यक्ती.
लसीकरणाच्या नोंदणीसाठी तीन पद्धती असून आगाऊ स्वरूपात स्वयम् नोंदणी करता येणार आहे. याचबरोबर प्रत्यक्ष आरोग्य केंद्रात जाऊन नोंदणी करण्याचाही पर्याय आहे. तिसऱ्या पर्यायात सरकार स्वतःहून लोकांची लसीकरणासाठी संपर्क साधणार आहे. आगाऊ स्वयम् नोंदणीसाठी लसीकरणास पात्र असलेले लोक को -विन ॲप डाऊनलोड करून स्वतःची नोंदणी करू शकतात. याच बरोबर आरोग्य सेतूवर देखील नोंदणी करता येणार आहे. को -विनचे संकेतस्थळ cowin.gov.in वर देखील नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची पद्धत : कोरोना लसित संबंधित ॲप किंवा संकेतस्थळावर जा, स्वतःचा मोबाईल क्रमांक द्या, एक ओटीपी मिळेल एस एम एस वरील ओटीपी द्वारे स्वतःचे खाते तयार करा, नांव, वय, लिंग नमूद करा, ओळख पत्र अपलोड करा, लसीकरण केंद्र अन् लस मिळण्याची तारीख निवडा, एका मोबाईल क्रमांकावरून चार जणांची नोंदणी शक्य. स्वयम् नोंदणी करता येत नसल्यास नजीकच्या कोरोना लसीकरण केंद्रात जाऊन स्वतःची नोंदणी करता येणार आहे. फेसिलेटेड नोंदणी ही पद्धत राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारांसाठी आहे. लक्षित गटासाठी लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. सर्व लक्षित गटाला आरोग्य केंद्रापर्यंत आणण्याचा प्रयत्न आरोग्य अधिकारी करतील.
कुठल्याही पद्धतीने नोंदणी केली असली तरीही लसीकरण हा पूर्वी संबंधिताला ओळखपत्र दाखवावे लागणार आहे सरकारने ज्या 12 प्रकारच्या ओळखपत्र यांना लसीकरणासाठी मान्यता दिली आहे, ती पुढील प्रमाणे आहेत. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पॅन कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, निवृत्तीवेतन दस्तऐवज, बँक /पोस्टाचे पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, खासदार /आमदार /नामदार यांचे ओळखपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवा ओळखपत्र, एनपीआर अंतर्गत प्राप्त स्मार्ट कार्ड.