बेळगाव महापालिकेने भूमिगत कचरा कुंडांसाठी (डस्टबिन) क्रेन असलेले 14 कम रिफ्युज कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी निविदा काढली आहे. ही निविदा पाहता लवकरच शहरांमध्ये ठिकाणी भूमिगत कचराकुंड बसविले जाणार हे निश्चित झाले आहे.
सदर निविदेला जोडलेल्या कागदपत्रांनुसार ही योजना बेळगाव दक्षिणमध्ये अंमलात आणली जाणार आहे. कारण बेळगाव दक्षिणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही निविदा काढली आहे. ओव्हर हेड कव्हर आणि वरच्या बाजूला एसएस 304 सुशोभित डबा असलेल्या 1.1 कम कॅपॅसिटी डस्टबिनचा पुरवठा आणि स्थापना, हायड्रोलिक डस्टबिन उचलण्यासाठी क्रेन असलेल्या 14 कम कॉम्पॅक्टरचा पुरवठा यासाठी ही निविदा काढण्यात आली आहे. तुडुंब भरून वाहणारे सार्वजनिक ठिकाणचे कचराकुंड अथवा कचरा डेपोची समस्या, त्यामुळे होणारे प्रदूषण, जागेची समस्या सर्वच महानगरांना भेडसावत आहे.
सुरत शहराने कचरा व्यवस्थापनासाठी 43 भूमिगत कचराकुंड (डस्टबिन) बसविले आहेत. या कचरा कुंडांमध्ये प्रत्येकी 1 टनापर्यंत कचरा जमा करता येतो. हे कचराकुंडी फुटपाथखाली भूमिगत बसविले जातात. प्रत्येक कचरा कुंडाला दोन मार्ग असतात यापैकी एका मार्गाद्वारे नागरिक कचरा टाकू शकतात तर दुसर्या मार्गाद्वारे महापालिकेला कचरा कुंडातील कचऱ्याची उचल करता येते. धातूचे हे प्रचंड डस्टबिन क्रेनच्या सहाय्याने उचलले जातात. या पद्धतीने मनुष्याचा थेट सहभाग न होता यांत्रिकरीत्या कचरा कुंडातील कचरा रिकामा केला जातो. याखेरीज 65 लाख रुपये खर्चाची कोरडा कचरा वेगळा करण्यासाठीची कन्वेयर बेल्ट सिस्टीम पुरवठा आणि ती बसवण्यासाठी देखील महापालिकेने निविदा काढली आहे.