विकासाच्या नांवाखाली शहर भकास आकडे वाटचाल करीत आहे. गेल्या तीन दिवसापासून नाथ पै सर्कलपासून खासबाग सर्कलपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकावरील वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे सत्र सुरू झाल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत रस्ता गटारींसह इतर विकास कामे राबविण्यासाठी अनेक वृक्ष तोडण्यात आले आहेत. नागरिकांनी विरोध करूनही त्याला न जुमानता वृक्षतोड केली जात आहे. विशालकाय 90 -100 वर्षे जूने डेरेदार वृक्ष क्षणार्धात भुईसपाट केले जात आहेत. यामुळे शहर विशेष करून उपनगरातील सावली, फळे -फुले देणारी झाडे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
खासबाग येथे रविवारी आठवडी बाजार भरतो. दुभाजकावर लावण्यात आलेल्या झाडांच्या सावलीखाली हा बाजार भरत असतो. गरिबांचा बाजार अशी ओळख असणाऱ्या या बाजारात बेळगाव परिसरातील व्यापारी विक्रीसाठी येत असतात.
आता या ठिकाणच्या झाडांची तोड केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांना उन्हातान्हात बसून आपला व्यवसाय करावा लागणार आहे. यापूर्वीदेखील स्मार्ट सिटीच्या नांवाखाली वृक्ष तोडण्यात आले आहेत. त्यामुळे विनाकारण वृक्षतोड करू नये. खासबाग बाजार रोडवरील वृक्षतोड तर तात्काळ थांबवावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.