शहरात स्मार्ट सिटी प्रकल्प ज्या ज्या ठिकाणी राबविण्यात आले आहेत, त्या त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या तक्रारींचा पाऊस हा नेहमीच पडत असतो. कधी रस्ते, कधी गटारी, कधी पथदीप, कधी खड्डे तर कधी आणखी काय…!
शहरातील रामलिंग खिंड गल्ली येथे वारंवार पार्कींच्या समस्येवरून व्यावसायिक आणि वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग घडून येतात. आज पुन्हा कारपार्किंग वरून व्यावसायिक, टोईंग करणारे वाहन कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडून आला आहे.
सम्राट अशोक चौक येथे असलेल्या एका कापड दुकानासमोर कार पार्किंग करण्यात आली होती. दुकानासमोर पार्किंग करण्यात आलेली ही कार काढण्यासाठी दुकानदाराने कारचालकाला सांगितले. दरम्यान यावेळी टोईंग वाहन देखील हजर झाले. परंतु टोईंग वाहन कर्मचाऱ्यांनी कार बाजूला काढण्याऐवजी दुकानदारालाच ‘नो पार्किंग’ साठी लावण्यात आलेले दगड हटविण्यास सांगितले.
यावेळी दुकानदार, परिसरातील व्यापारी आणि टोईंग वाहन कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. टोईंग वाहन कर्मचाऱ्यांचे काम हे नो पार्किंग मध्ये उभी करण्यात आलेली वाहने उचलून नेण्याचे आहे. शिवाय रामलिंग खिंड गल्ली येथील रस्त्यावर कार पार्किंगसाठी परवानगी नसल्याचेही वाहतूक विभागाच्या पोलिसांशी चर्चा करून ठरविण्यात आले आहे. परंतु तरीही काही वाहनचालक हेकेखोरपणा दाखवून व्यावसायिकांशी वादावादी करतात. हे प्रकार सातत्याने याठिकाणी सुरु असतात.
रामलिंग खिंड गल्ली येथील रस्त्याचे केवळ पार्किंगची सोय करण्याच्या दृष्टिकोनातूनच रुंदीकरण करण्यात आले आहे. जेव्हापासून रुंदीकरणाचे काम झाले आहे, तेव्हापासून दररोज पार्किंगवरून वादावादीचे प्रकार घडत असतात. अनेकवेळा वाहतूक पोलिसांना याठिकाणी पाचारण करण्यात येते. शहर उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनाही येथील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
परंतु प्रत्येकाकडून आश्वासनाव्यतिरिक्त कोणताही उपाय या समस्येवर काढण्यात आला नाही. रामलिंग खिंड गल्ली परिसरातील व्यावसायिक सततच्या या प्रकाराला वैतागले असून, या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी करत आहेत.