खणलेले खड्डे उडणारी धूळ आणि दंड आकारण्यासाठी टपून बसलेल्या रहदारी पोलिसांचा त्रास हे चित्र बदलणार तरी कधी? असेच सध्या शहरात वाहने हाकणाऱ्या समस्त वाहनचालकांना वाटू लागले आहे.
सध्या शहरात सर्वत्र स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. यासाठी अनेक ठिकाणी खुदाई करण्यात आली आहे. मग ते आरटीओ सर्कल असो, बसस्थानक परिसर असो, कॉलेज रोड असो किंवा गोवावेस असो या सर्व परिसरामध्ये वाहतूक कोंडी नित्यनेमाची झाली आहे. रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे गोवावेस येथे आज सकाळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीमुळे वेळेचा अपव्यय याबरोबरच वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शहरात नित्यनेमाने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दक्षिण बेळगावमधून उत्तर बेळगावमध्ये किंवा उत्तर बेळगावमधून दक्षिण बेळगावमध्ये जाणाऱ्या नागरिकांना अर्धा तास अगोदरच घरातून बाहेर पडावे लागत आहे. अलीकडे लोकांची ही मानसिकताच बनून गेली आहे.
खणलेले रस्ते, वाहतुकीची कोंडी आदी सर्व त्रासातून बेळगावकरांची केव्हा मुक्तता होणार देव जाणे. स्मार्ट सिटीचे काम गेल्या 6 वर्षापासून सुरू आहे. परंतु आजतागायत पूर्ण झालेली बोटावर मोजता येतील इतकी मोजकी कामे वगळता उर्वरित सर्व विकास कामे रखडत सुरू आहेत.
एखाद्या ठिकाणी खोदकाम सुरु करून विकास काम हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण करूनच दुसरे काम हाती घेण्याऐवजी हातातील काम अर्धे सोडून दुसरे काम हाती घेतले जात आहे. यामुळे अर्धवट स्थितीत पडून असलेल्या विकास कामे, त्यामुळे निर्माण झालेली धूळ माती वाहतुकीची कोंडी या सर्व गोष्टींमुळे नागरिकांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
शहरात ठिकठिकाणी केलेल्या खोदकामामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून कष्टाने वाहने चालवावी लागत आहेत. अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे अपघाताचा धोका तर वाढलाच आहे शिवाय सातत्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
यात भर म्हणून आता उन्हाळा देखील सुरू होत आहे अशा परिस्थितीत उन्हाचा तडाखा आणि रस्त्यावरील धुळीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. तेंव्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांना रहदारीच्या त्रासातून करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.