राज्यातील इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे शालेय वर्ग येत्या 22 फेब्रुवारीपासून पूर्ववत सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची गर्दी होणार असल्याने सर्व शाळांमध्ये कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन अत्यंत आवश्यक असल्याचा सल्ला प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिला आहे.
शाळांमधील इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शिक्षण खाते आणि आरोग्य खात्याने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचीचे तंतोतंत पालन केले जावे. इयत्ता सहावी वरील इयत्तांमधील विद्यार्थ्यांनी दुपारचा माध्यान आहार आपल्या घरातूनच आणला पाहिजे. शाळेमध्ये सर्वांनी सामाजिक अंतर आणि स्वच्छतेचे नियमांबरोबरच तोंडावर मास्क वापरणे सक्तीचे असेल, असे शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनी सांगितले.
येत्या 22 फेब्रुवारीपासून शाळांमधील इयत्ता सहावीवरील वर्ग दररोज सकाळी 10 ते सायंकाळी 4:30 वाजेपर्यंत भरतील. मात्र शनिवारी शाळेची वेळ सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत असणार आहे. समाज कल्याण खाते मागासवर्गीय कल्याण खाते आणि अल्पसंख्याक कल्याण खात्याची वसतिगृहे तसेच इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी आरोग्य खात्याने एसओपी जारी केला असून त्याचे पालन केले जावे. कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती लक्षात घेऊन पटसंख्या पूर्ण भरावी यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल होण्याचा कालावधी 30 मार्च पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती देखील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.