न्यायालयीन आवारात आणि जिल्हाधिकारी परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत वाहनांची गर्दी अधिक प्रमाणात होताना दिसत आहे. पार्किंग करण्याऐवजी नको तिथे वाहने लावून डोकेदुखी वाढवण्यात अनेकांनी धन्यता मानत आहे. त्यामुळे याकडे आता जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन येथील वाहनांची गर्दी कमी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान जागेचे व्यवहार व इतर संबंधी अनेक एजंट आपली वाहने तेथेच लावून दिवसभर भटकत आहेत. याबाबत काहीही हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर दादागिरी करण्याचे प्रकारही वाढले आहेत.
ही वाहने अनेकांना अडचणीचे ठरू लागले आहेत तर मुख्य रस्त्यावर ही वाहने लावून येथून दिवसभर आपली कामे करण्यात मग्न असणाऱ्यांच्या वाहनांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
रहदारी पोलीस बेकायदेशीररित्या पार्किंग केलेल्या वाहनावर कारवाई करते. मात्र जिल्हाधिकारी आणि न्यायालय आवारात असणाऱ्या चारचाकी वाहनांवर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. रहदारी पोलिसांनी या समस्येकडे ही गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. न्यायालय परिसरात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आहे.
त्या ठिकाणी पार्किंग करण्यात येते तर जिल्हाधिकारी आवारात ही पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक जण खाजगी कामासाठी येऊन संबंधित ठिकाणी पार्किंग करून अडचणी निर्माण करण्यात येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत.