पोलीस भरती प्रक्रियेमध्ये शारीरिक चांचणीत भलत्याच उमेदवाराने भाग घेतल्याचा आणि भरती मात्र दुसऱ्याचीच झाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी मार्केट पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
लक्ष्मण वेंकन्ना होसकोटी (वय 27, रा. कळ्ळीगुद्दी ता. गोकाक) आणि सचिन गुग्गरी (वय 21, रा. घटप्रभा) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नांवे आहेत. जिल्हा पोलीस प्रमुखांच्या कार्यालयातील सहाय्यक प्रशासकीय अधिकारी मनोज मधुकर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली. उपरोक्त दोघांसह एकूण तिघा जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, लक्ष्मण होसकोटी या तरुणाने पोलीस भरतीची प्रक्रिया पूर्ण केली असून त्याची भरती ही झाली आहे. गेल्या 26 फेब्रुवारी रोजी तो पोलीस दलात रुजू होण्यासाठी आला त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्याच्या संबंधीची कागदपत्रे पडताळली.
पोलीस भरती शारीरिक चांचणीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाते. अधिकाऱ्यांनी व्हिडीओ पाहिला असता जो उमेदवार शारीरिक चांचणीसाठी हजर होता तो भलताच असल्याचे उघडकीस आले. यावरून ज्या लक्ष्मण होसकोटी याची पोलीस दलात भरती झाली आहे, तो शारीरिक चांचणीस हजर नव्हता हे उघडकीस येताच त्याची कसून चौकशी करण्यात आली. तेंव्हा त्याने फसवणुकीचा प्रकार मान्य केला. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी,पी एस आय विठ्ठल हावनावर,पोलीस विरुपक्ष बुधनावर,एल एस कडोलकर,विश्वनाथ माळगी आदींनी तपासात सहभाग घेतला होता.
पोलीस भरती प्रक्रियेत अनेक गैरप्रकार सुरूच आहेत. कधी प्रश्नपत्रिका फुटते तर कधी एकाच्या नांवाने दुसराच परीक्षा लिहितो. आता शारीरिक चांचणीमध्ये देखील या पद्धतीने फसवणुकीचा प्रकार घडल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांवर आळा घालण्यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या असल्या तरी गैरमार्गाने भरती होण्याचे प्रकार सुरूच आहेत. खास करून गोकाक तालुक्यात असे प्रकार वाढीस लागल्याचे सांगितले जात आहे.