रात्रीची वेळ… पोटच्या मुलाला तातडीने रक्ताची गरज आणि मदतीसाठी कोणी नाही, अशा असाहाय्य अवस्थेत असलेल्या एका जोडप्याच्या मदतीला धावून जाताना फेसबुक फ्रेंड्स सर्कलने त्यांच्या चिमुरड्या मुलासाठी त्वरेने 4 युनिट रक्त उपलब्ध करून दिल्याची घटना काल रात्री घडली.
याबाबतची माहिती अशी की, यमकनमर्डी येथील निरंजन छत्री या सुमारे चार वर्षे वयाच्या बालकाला उपचारासाठी केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. कॅन्सरचे निदान झालेल्या निरंजन वरील उपचारासाठी काल रात्री तातडीने ओ -पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती.
बेळगावात मदतीसाठी कोणीच नसल्यामुळे तसेच अशावेळी सहाय्यभूत ठरणारा स्मार्टफोन उपलब्ध न झाल्यामुळे निरंजनच्या वडिलांनी आपल्याकडील साध्या मोबाईलवरून याबाबत गावाकडे कळविले. मात्र रात्रीच्यावेळी गावाकडूनही कोणी येणे शक्य नसल्यामुळे निरंजनचे आई -वडील असहाय्य होऊन अक्षरशः रडकुंडीला आले होते. दरम्यान यमकनमर्डी गावातील एका युवकाने याबाबतची माहिती फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांना देऊन संबंधित छत्री दांपत्याला मदत करण्याची विनंती केली.
तेंव्हा संतोष दरेकर यांनी तात्काळ केएलई हॉस्पिटलकडे धाव घेऊन मदत कार्य हाती घेत संबंधित बालकासाठी 4 युनिट आवश्यक रक्त उपलब्ध करून दिले. याबद्दल छत्री दांपत्याने कृतज्ञता व्यक्त करून दरेकर यांना धन्यवाद दिले आहेत. दरम्यान, रात्रीच्या वेळी एखाद्याने तातडीच्या कामासाठी मोबाईल फोन मागितल्यास हॉस्पिटलमधील कांही रुग्णांचे नातेवाईक आपल्याकडील दर्जेदार मोबाईल फोन देणे टाळतात.
कृपया असे करू नये कारण त्या एका फोनवर एखाद्याचे जीवन-मरण अवलंबून असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. तेंव्हा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या स्मार्टफोन बाळगणाऱ्या नातलगांनी रात्रीच्या वेळी अन्य एखाद्या रुग्णाचे नातेवाईक फोन मागत असतील तर आपल्याकडील फोन त्यांना देऊन सहाय्य करावे, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.