न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही पोलीस बळाचा वापर करून मंगळवारी हलगा मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला. मात्र असा प्रयत्न पुन्हा केला जाण्याची शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी मंगळवारी रात्री बायपासच्या ठिकाणी मच्छे शिवारात मुक्काम ठोकला होता.
हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या विरोधात काल मच्छे शिवारामध्ये शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यामुळे मोठ्या पोलीस फौजफाट्यासह मच्छे शिवारात बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी आलेल्या कंत्राटदार व प्रशासकीय अधिकाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागले होते.
संतप्त शेतकऱ्यांनी अधिकारीवर्गाला कोणत्याही परिस्थितीत बायपास रस्त्यासाठी आपल्या सुपीक जमिनी देणार नाही असे ठणकावून सांगितले आहे. उच्च न्यायालयाने हलगा मच्छे बायपास रस्त्याला स्थगिती दिली असताना देखील विकासाच्या नावावर सुपीक जमिनी हडप करण्याचा घाट प्रशासनाने रचला असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी काल तीव्र आंदोलन छेडून अधिकाऱ्यांना हुसकावून लावले असले तरी बायपास रस्त्याचे काम हाती घेण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले जाणार हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी काल मंगळवारी रात्री मच्छे शिवारामध्ये ठाण मांडले होते.
त्याच ठिकाणी छोटा मंडप घालून शेतकरी रात्री 9:30 वाजता तेथेच जेवण करून तिथेच झोपून राहिले. कारण आदले दिवशी ग्रामीण एसीपी समोर चर्चा होऊनही कंत्राटदाराने न ऐकल्याने आज पुन्हा मागे गेल्यासारखे करुन तोच कित्ता गिरवत रात्री काम सुरु करतील म्हणून शेतकरी तिथेच मंडपात झोपून होते.