अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. आडवय्या शंकरय्या पुजारी (वय ३०) रा. कादरवळ्ळी, ता. कित्तूर असे शिक्षा झालेल्या नराधमाचे नाव आहे.
आडवय्या याने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. त्यानंतर ती गर्भवती राहिली. याप्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी कित्तूर पोलीस स्थानकामध्ये त्याच्या विरोधात फिर्याद नोंदविली. पोलिसांनी ३७६ (२) आणि पॉक्सो कायदा ४ आणि ६ अन्व्ये गुन्हा दाखल केला.
तिसरे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांनी दोषारोप दाखल केले. त्याठिकाणी १३ साक्षी, ८१ कागदपत्रे आणि एक मुद्देमाल तपासण्यात आला.
त्यामध्ये आडवय्या हा दोषी आढळला. न्यायाधीश मंजाप्पा अन्नयनावर यांनी आडवय्या याला जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर सदर मुलीला २ लाख रुपये जिल्हा कायदा सेवा प्राधिकार यांनी द्यावी, असा आदेशही काढण्यात आला आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील यांनी काम पहिले.