बेळगावमध्ये निवडणुकीचे वारे वहात असून येत्या काही दिवसात पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर मद्य वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर धाड घालून सुमारे १३ लाखांचे गोवा बनावटीचे आणि सैन्य दलात विक्री करण्यात येणारे मद्य जप्त करण्यात आले आहे. सीसीआयबी पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गोवा बनावटीचे तसेच सैन्य दलासाठी विक्री करण्यात येणारये मद्य जप्त केले आहे. याप्रकरणी संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त के. त्यागराजन, डीसीपी विक्रम आमटे, नारायण बरमणी यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने आज (मंगळवार दि. १६ फेब्रुवारी) सकाळी सीसीआयबी चे पोलीस इन्स्पेक्टर संजीव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कॅम्प पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत येणाऱ्या विजय नगर परीसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
गोवा राज्यात विक्री करण्यात येणारे मद्य आणि मिलिटरी कँटिनमधून सैन्य दलासाठी उपलबध असणारे मद्य बेकायदेशीर रित्या विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शिवाय हे मद्य दुप्पट दराने विक्री करण्यात येत असल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी राजेश केशव नाईक (वय ३७, रा. कुमारस्वामी लेआऊट, बेळगाव), शंकर बसवंत देशनुर (वय ३८ रा. कोनवाळ गल्ली, कणबर्गी) सध्या दोघेही राहणार विजय नगर, बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून गोवा बनावटीची विविध कंपन्यांच्या ५४७ बाटल्या, आणि मिलिटरी कँटिनमधील माजी सैनिकांसाठी विक्री करण्यात येणाऱ्या २०३ बाटल्या अशा एकूण १३ लाख रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलीस चौकशीत या मद्याची विक्री पोटनिवडुनिकसाठी करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी कॅम्प पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.