सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि महाराष्ट्रातील कृतिशील व्यक्तिमत्व पी. बी. सावंत यांचे निधन झाले. त्यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या दाव्यांबाबत न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्यासमवेत डॉ. एन. डी. पाटील, न्यायमूर्ती अरविंद सावंत आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा चर्चा करून मार्गदर्शन घेतले होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी श्रद्धांजली वाहिली. सर्वसामान्यांच्या हक्कासाठी, अधिकारासाठी आपले जीवन त्यांनी व्यतीत केले होते. त्यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी आणि उन्नतीसाठी दिलेले विचार हे नेहमी समरणात राहतील.
पी. बी. सावंत यांनी दिलेले निवाडे आदर्शवत असे होते. त्यांनी दिलेल्या निकालानंतर त्या निकालाला अनुसरून संसदेत कायदे करावे लागले आहेत. एक आदर्श वकील, न्यायमूर्ती आणि विचारवंतांच्या निधनाने महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे आणि सीमाभागातील मराठी माणसाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली व्यक्त केली.
त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, ऍड. राजाभाऊ पाटील आदींनीही श्रद्धांजली वाहिली आहे.