मराठा मंडळ डेंटल कॉलेजच्या (एमएमडीसी) सेन्ट्रल रिसर्च लॅबोरेटरी येथील नव्या कोरोना तपासणी केंद्राचा उद्घाटन समारंभ मंगळवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3170 चे प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या हस्ते पार पडला.
उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी रोटरी क्लब बेळगावचे अध्यक्ष डॉ. के. एम. केळुसकर यांनी सर्वांचे स्वागत केले. रो. शरद पै यांनी सदर कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्याचा मूळ उद्देश स्पष्ट केला. सर्वसामान्य नागरिकांचे स्वॅबचे नमुने गोळा करणे सोयीचे जावे आणि तपासणी अहवाल त्वरेने उपलब्ध व्हावा यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे पै यांनी सांगितले. दानशूर व्यक्तींच्या देणगीमुळेच ही सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संबंधित देणगीदारांचा प्रमुख पाहुण्या उत्कर्षा पाटील आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती राजेश्री नागराजू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लेक व्ह्यू हॉस्पिटलचे संचालक डॉ. शशिकांत कुलगोड यांनी कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असताना अगदी योग्य वेळी हे कोऱोना तपासणी केंद्र सुरु होत असल्याचे सांगितले. या केंद्रासाठी लेक व्ह्यू हॉस्पिटल गोवावेस येथे स्वॅबचे नमुने घेतले जातील. त्याचप्रमाणे ज्यांना हॉस्पिटलला येणे शक्य नाही अशा नागरिकांसाठी घरी जाऊन स्वॅबचे नमुने घेण्याची सुविधा देखील आम्ही उपलब्ध केली आहे, अशी माहिती कुलगोड यांनी दिली. एमएमडीसीचे मुख्य मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ. किशोर भट यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावने तपासणीसाठी देऊ केलेली ट्रूनट आरटी -पीसीआर मशीन अत्यंत अचूक आणि त्वरेने निकाल देणारी असल्याचे सांगून ही मशीन क्षयरोग, चिकनगुनिया आदी रोगांचे निदान करण्यासाठी देखील उपयोगी असल्याचे सांगितले. तसेच कोरोना चांचणीचा अहवाल त्याच दिवशी उपलब्ध होईल. असेही स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या कोरोना तपासणी केंद्राचा मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावा. तसेच कोरोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केले. प्रांतपाल संग्राम पाटील यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. अखेर राजेश्री नागरराजू यांच्या अध्यक्ष भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
एमएमडीसीचे प्राचार्य डॉ. रमाकांत नायक यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आसावरी संत आणि डॉ. शिल्पा कोडकणी यांनी केले. दरम्यान स्वॅब तपासणी संदर्भात नागरिकांनी अधिक माहितीसाठी डॉ. सुशांत गुट्टीगोळी यांच्याशी 9902758019 / 0831 -2403333 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.