Friday, October 18, 2024

/

कपिलेश्वर कॉलनीतील “हे” अर्धवट विकासकाम ठरतंय धोकादायक

 belgaum

कपिलेश्वर कॉलनी, मेन रोड येथे विकास कामांतर्गत करण्यात आलेले खोदकाम, तसेच खोदकामाप्रसंगी या ठिकाणचे ड्रेनेज पाईप फुटून निर्माण झालेला मैला व सांडपाण्याचा खड्डा या दोन्ही गोष्टी स्थानिक रहिवाशांसाठी विशेष करून लहान मुलांसाठी धोकादायक बनल्या आहेत. तेंव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन ड्रेनेज दुरुस्ती करून सदर विकास काम तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेतलेली विकास कामे त्वरित पूर्ण करण्याऐवजी अर्धवट अवस्थेत सोडून नागरिकांना त्रासात टाकण्याचा प्रकार सध्या कपिलेश्वर कॉलनी मेन रोड येथे सुरू झाला आहे. कपिलेश्वर कॉलनी मेन रोड येथे विकास कामाअंतर्गत रस्ता खोदाई करण्यात आली आहे. मात्र सदर खोदकाम करतेवेळी ड्रेनेज पाईपलाईन फुटली आहे. गेल्या 20 दिवसांपूर्वी हा प्रकार घडला असून आजतागायत सदर रस्ता खोदलेल्या अवस्थेतच पडून आहे.

त्याचप्रमाणे ड्रेनेज पाईपलाईन फुटलेल्या ठिकाणच्या खड्ड्यामध्ये मैला आणि सांडपाणी तुंबून राहिले आहे. परिणामी दुर्गंधी बरोबरच डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डासांच्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू , मलेरियाची भीती बळावली असून आसपासचे नागरिक विशेष करून लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे.Kapileshwar coloney

याखेरीज गेल्या 20 दिवसांपासून रस्त्यावर पडून असलेल्या दगडमातीच्या ढिगारा आणि निर्माण झालेल्या चिखलामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन रात्रीच्यावेळी अपघाताचा धोका वाढला आहे. या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा घरे आहेत. येथील लहान मुले रस्त्यावर खेळत असतात. या लहान मुलांसाठी रस्त्यावर खोदण्यात आलेला आणि ड्रेनेजच्या सांडपाण्याने भरलेला खड्डा मृत्यूचा सापळा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तेंव्हा या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कपलेश्वर कॉलनी, मेन रोड येथील सदर फुटलेल्या ड्रेनेजची दुरुस्ती करून हाती घेतलेले विकास काम तात्काळ पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.