ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या आयटीआय परीक्षा रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी आयटीआय विद्यार्थ्यांनी कन्नड साहित्य भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
ऑनलाईन परीक्षा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येऊ नयेत, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली.
परीक्षेच्या एक दिवस आधी रात्री हॉलतिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. एका दिवसात १०० ते २०० किलोमीटर अंतरावर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना पोहोचावे लागते. ऑनलाईन परीक्षा केंद्रात अनेकवेळा सर्व्हरची खूप मोठी समस्या निर्माण होते.
काहीवेळा तीन तासाहून अधिक काळ सर्व्हरची वाट पहावी लागते. परीक्षा सुरु झालेल्या अर्ध्या तासात सर्व्हर डाऊन होते. अर्ध्या तासानंतर पुन्हा सुरु होते.
काहीवेळा सर्व्हर डाऊन असल्याकारणाने हॉलतिकीट उपलब्ध न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. या साऱ्या समस्यांचा विचार करून ऑनलाईन परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी आयटीआय विद्यार्थ्यांनी केली.