बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग पुनर्रचनेचा फेरविचार केला जावा यासाठी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्याची सुनावणी आज गुरुवारी होणार होती. मात्र सरकारी वकिलांनी आक्षेप दाखल करण्यास मुदत मागितल्याने दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणी केली जाईल, असे न्यायाधीशांनी सांगितले असल्याची माहिती माजी उपमहापौर ॲड. धनराज गवळी यांनी बेळगाव लाईव्हशी बोलताना दिली.
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग पुनर्रचना आणि आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. कोणताही बदल न करता पुन्हा 2018 सालची वादग्रस्त प्रभाग पुनर्रचना जाहीर करण्यात आल्यामुळे त्याच्याविरोधात माजी नगरसेवकांनी कर्नाटक उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठासमोर आज गुरुवारी होणार होती. मात्र सरकारी वकिलांनी माजी नगरसेवकांनी दाखल केलेल्या दाव्यावर आक्षेप घेण्यासाठी दोन आठवड्याची मुदत मागितली आहे. याच कालावधी म्हणजे 15 पंधरा दिवसात सरकारकडून देखील प्रभाग आरक्षणाबाबत अधिसूचना जारी केली जाणार आहे. या बाबी लक्षात घेऊन न्यायाधीशांनी येत्या दोन आठवड्यानंतर दाव्याची अंतिम सुनावणी करण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता दोन आठवडे लांबणीवर पडलेल्या या दाव्याच्या सुनावणीकडे माजी नगरसेवक व शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.