वीट उत्पादनाच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातील एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना काल गुरुवारी प्रभूनगर खानापूर येथे उघडकीस आली आहे.
सदर अत्याचारप्रकरणी प्रभूनगर येथील बसवराज रुद्राप्पा नायक (वय 20) या संशयित युवकावर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खानापुर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बसवराज सध्या फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अत्याचाराची ही घटना रविवारी घडली होती. मात्र घरची हलाखीची परिस्थिती आणि स्थानिकांकडून प्रतिसाद मिळणार नाही असे वाटल्याने पीडित मुलीच्या आईवडिलांनी घाबरून पोलिसात तक्रार दिली नव्हती.
दरम्यान सदर प्रकरणाची कुजबूज खानापूर पोलिसांच्या कानावर जाताच त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता अत्याचाराचा प्रकार उघडकीस आला. त्या मुलीचे कुटुंब मूळचे हुक्केरी तालुक्यातील असून कामानिमित्त ते दोन महिन्यापूर्वी प्रभूनगर खानापूर येथे स्थायिक झाले आहे.
गेल्या रविवारी 7 फेब्रुवारी रोजी दुपारी 4च्या सुमारास संबंधित नराधमाने सदर मुलीला माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून शिवारापासून कांही अंतरावर असलेल्या डोंगरावर नेऊन अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.
पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी झाली असून संशयिताचा शोध घेतला जात आहे. खानापूर गुन्हा विभागाचे पोलिस उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ यांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.