महाराष्ट्र आणि केरळ मध्ये पुन्हा कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत असून या पार्श्वभूमीवर कर्नाटकात कोविड विषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.
कर्नाटकाच्या अनेक चेकपोस्ट वर कोविड संदर्भातील मार्गसूचीचे पालन करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड चाचणी अहवाल निगेटिव्ह असणे आवश्यक असून अहवाल निगेटिव्ह असेल तरच कर्नाटकात प्रवेश देण्यात येत आहे.
कोविड तांत्रिक सल्लागार समितीच्यावतीने नवी मार्गदर्शक सूची जाहीर करण्यात आली असून कर्नाटकात कोविड पसरण्यापासून रोख लावण्यासाठी कठोर पाऊले उचलण्यात आली आहेत. विशेषतः वसतिगृहांवर अधिक लक्ष देण्यात येत आहे. कर्नाटक आरोग्य खात्याच्यावतीने सुरक्षेच्या कारणास्तव अनेक ठिकाणी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. शनिवारी यासंदर्भातील नवी मार्गसूची आरोग्य खात्याच्यावतीने प्रसारित करण्यात आली असून महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांसाठी कडक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
मुंबईची कोविड आकडेवारी पाहता दुप्पट वेगाने पुन्हा कोविड चा फैलाव होत आहे. अमरावती, नागपूर, पुणे आणि इतर महाराष्ट्रातील शहरांमध्ये कोविड वेगाने पसरत आहे. मागील २४ तासात ६००० हुन अधिक रुग्णांची भर पडली आहे.
या पार्श्वभूमीवर कर्नाटकात पूर्वखबरदारी घेण्यात आली असून विमान, रेल्वे, बस आणि खाजगी वाहनातून प्रवास करून कर्नाटकात दाखल होणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे.