काॅन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय) या संघटनेच्या बेळगाव शाखेच्या नूतन चेअरमनपदी सुप्रसिद्ध व्हेगा ऑटो प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप चांडक यांची तर व्हाईस चेअरमनपदी स्नेहम इंटरनॅशनलचे व्यवस्थापकीय संचालक अनिष ए. मेत्राणी यांची निवड झाली आहे.
बेंगलोर येथे झालेल्या सीआयआयच्या बैठकीमध्ये संघटनेच्या बेळगाव जिल्हा शाखेची नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी दिलीप चांडक आणि अनिश मेत्राणी यांची वरीलप्रमाणे निवड झाली.
औद्योगिक क्षेत्रातील तब्बल 30 हून अधिक वर्षाचा अनुभव असणारे भारतीय उद्योजक दिलीप चांडक बेळगावातील ऑटोमोबाईल उपकरणांचे आद्यप्रवर्तक असून भारतात रस्ते सुरक्षा बाबत प्रचार करण्यात अग्रभागी आहेत. एक कुशल संघटक आणि ग्राहकांची नस अचूक ओळखणारे चांडक ग्राहकांच्या गरजांचा नाविन्यपूर्ण विपणन उपायांद्वारे बाजार भाग भांडवलासाठी आणि सुपीक व्यवसाय रणनीतीसाठी उपयोग करतात.
संकटाचे संधीमध्ये रूपांतर करण्याच्या त्यांच्या क्षमतेची प्रचिती त्यांनी ऑटोमोबाईल उपकरणं, बांधकाम क्षेत्र आदींसह विमान क्षेत्रातील केलेल्या उत्तुंग प्रगती वरून लक्षात येते. दूरदृष्टीच्या दिलीप चांडक यांनी जागतिक दर्जाची उत्पादने बाजारात आणण्याबरोबरच औद्योगिक क्षेत्रात भारताला जगाच्या नकाशावर आणण्याचे काम केले आहे.
उद्योजक अनिष मेत्राणी यांनी 1996 स्नेहम इंटरनॅशनल ही प्रमुख कंपनी सुरू केली. या कंपनीमध्ये प्रामुख्याने हाय एन्ड इलेक्ट्रिकल सोलुशन उत्पादनासह पॉवर अँड कम्युनिकेशन केबल उद्योगासाठी आवश्यक टेप्सचे उत्पादन केले जाते. या व्यतिरिक्त संयुक्त अमेरिकेमध्ये स्नेहम ग्लोबल एलसीसी ही त्यांची स्वतःच्या मालकीची कंपनी आहे. “स्नेहम”चे 400 हून अधिक कर्मचारी हे जागतिक कार्यबल आहे. उपरोक्त निवडीबद्दल उद्योजक दिलीप चांडक आणि अनिष मेत्राणी यांचे औद्योगिक क्षेत्रासह सर्वत्र अभिनंदन होत आहे.