शहरात स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरु असलेल्या कामातील रस्ते बांधकामासह सर्व महत्वाची कामे येत्या तीन महिन्याच्या आत पूर्ण करण्याची सूचना, जिल्हा प्रभारी सचिव एल. के. अतिक यांनी अधिकाऱ्यांना दिली. स्मार्ट सिटी कार्यालयात बुधवारी (दि. २४) पार पडलेल्या स्मार्ट सिटी कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून सुरु असलेले कामकाज अत्यंत धिम्यागतीने होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यासाठी हि सर्व कामे येत्या तीन महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याची सूचना अतिक यांनी अधिकाऱ्यांना दिली. पावसाळ्यापूर्वी सर्व कामकाज पूर्ण होणे गरजेचे असून रस्ते, वीज जोडणी या कामाला प्रामुख्याने पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.
शहरातील घनकचरा व्यवस्थापनाकडे लक्ष पुरविण्यात यावे. सध्या शहर परिसरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही.
वैज्ञानिक दृष्ट्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याकडे लक्ष पुरविण्यासंदर्भात त्यांनी चर्चा करून या संबंधित सर्व समस्या दूर करण्याबाबत अधिकाऱ्यांना सुचविले. हॉटेल, भाजीपाला आणि मांसाचा कचरा या सर्व कचऱ्याचे योग्यरितीने व्यवस्थापन करण्यात यावे, असेही त्यांनी सांगितले.
बेळगाव स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक संचालक शशिधर कुरेर यांनी स्मार्ट सिटी कामकाजासंबंधी या बैठकीत माहिती दिली. या बैठकीला जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन सी. व्ही., अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, महानगरपालिका आयुक्त के. एच. जगदीश यांच्यासह स्मार्ट सिटी आणि पालिका अभियंते उपस्थित होते.