बेळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणी छापा टाकून गांजा आणि अंमली पदार्थांची तस्करी, विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.
पोलीस उपायुक्त विक्रम आमटे यांनी बेळगावला गंजविक्रीमुक्त करण्याचा ध्यास घेतला असून अशा कारवायांचा त्यांनी सपाटा लावला आहे. शनिवारी रात्री विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जुने बेळगाव परिसरात धाड टाकून दीड किलो गांजा जप्त केला आहे.
शनिवारी रात्री डीसीपी विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट एसीपी कट्टीमनी आणि पथकाने बेळगाव शहरातील शहापूर पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत असणाऱ्या भागात धाड टाकून गंजविक्री करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याजवळील दीड किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
येडियुरप्पा मार्गावर गांजा विक्री करणाऱ्या ज्ञानेश्वर पाटील (वय २२, रा. धामणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शहर परिसरात अशा अनेक ठिकाणी धाड टाकून गांजा विक्री, अंमली पदार्थ विक्री करणारे अड्डे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
मटका, जुगार खेळणाऱ्यांवरही अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येत असून डीसीपी विक्रम आमटे यांनी बेळगावला या सर्वातून मुक्त करण्यासाठी धाड मोहीम सत्र आखले आहे.
आपल्या आजूबाजूला, परिसरात गांजा विक्री, मटका, जुगार किंवा इतर कोणत्याही पद्धतीची बेकायदेशीर गोष्ट घडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित आपल्या नजीकच्या पोलीस स्थानकात संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.