Friday, November 15, 2024

/

कौतुकास्पद… विमानतळावर विद्यार्थी देताहेत कोरोना संदर्भात निशुल्क सेवा

 belgaum

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव काळात बेळगाव विमानतळ सरकारने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून प्रवाशांना सुरक्षित आणि आश्वासक विमानसेवा देत आहे. वैशिष्ट्यपूर्ण बाब ही आहे की, इतर विमानतळावर पहावयास मिळणार नाही असे स्थानिक शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थ्यांचे सहकार्य विमानतळाला लाभत आहे, अशी माहिती बेळगाव विमानतळाचे संचालक राजेश कुमार मौर्य यांनी दिली.

लॉकडाऊननंतर बेळगाव विमानतळावरील विमान सेवा पुनश्च सुरु झाली आणि अल्पावधीत येथील विमान सेवेला इतका मोठा प्रतिसाद मिळाला की आज बेळगाव विमानतळ हे राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वात व्यस्त विमानतळ आहे. बेळगाव विमानतळावर संदर्भातील सरकार आणि आरोग्य खात्याच्या मार्गदर्शक सूचीचे काटेकोर पालन करून प्रवाशांना त्वरेने हवाई सेवा कशी उपलब्ध होईल यावर प्रामुख्याने भर दिला जात आहे. सॅनिटायझेशन बरोबरच विमानतळावर मास्कची सक्ती आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे.

खास नमूद करावयाची बाब ही की, सदर प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी स्थानिक ॲपटेक आणि पिपल एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थांचे उस्फुर्त सहकार्य लाभत आहे.

या संस्थांचे चार विद्यार्थी दररोज स्वयंस्फूर्तीने कोणत्याही मानधना विना विमानतळ कर्मचारी व सुरक्षा रक्षकांच्या मदतीने विमानतळावर प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे यासाठी मार्गदर्शकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहेत, हे विशेष होय. कारण बेळगाव वगळता स्थानिकांच्या सहकार्याने राबविला जाणारा असा स्तुत्य उपक्रम अन्य कोणत्याही विमानतळावर दिसून येणार नाही.

बेळगाव विमानतळासाठी हे विद्यार्थी देत असलेल्या सेवेचे कौतुक करावे तितके थोडे आहे असे सांगून कोरोना प्रादुर्भाव काळात बेळगाव विमानतळाने प्रवाशांना अत्यंत सुरक्षित व आश्वासक विमानसेवा दिली आहे. विमानसेवा पुनश्च सुरू झाल्यापासून आतापर्यंत आरोग्य संदर्भात अथवा अन्य कोणत्याही संदर्भात एकही तक्रार आलेली नसल्याचे राजेशकुमार मौर्य यांनी स्पष्ट केले.Airport

भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या देशातील टू -टायर विमानतळांच्या यादी असणाऱ्या बेळगाव विमानतळाबाबत माहिती देताना मौर्य म्हणाले की, या विमानतळाची टर्मिनल इमारत 3600 चौरस मीटरमध्ये पसरलेली आहे. विमानतळाची धावपट्टी 2300 मीटर इतकी लांब असून या ठिकाणी एअर बस 230, बोईंग 373 यासारखी प्रचंड आकाराची विमाने सहज उतरू शकतात. रात्रीच्या वेळी देखील सुलभरीत्या विमानांचे आगमन आणि उड्डाण व्हावे यासाठी विमानतळावर सर्व ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. बेळगाव विमानतळावर एअर बस सारखी तीन मोठी विमाने आणि तीन सर्वसामान्य लहान विमाने पार्क करता येतील इतकी विस्तीर्ण जागा आहे.

विमानतळाच्या 100 कि. मी. परिघातील शहर आणि गावांमधील लोकांना सध्या बेळगाव विमानतळ हे अत्यंत सोयीचे ठरत आहे. बेळगावसह धारवाडपासून निपाणीपर्यंत तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर वगैरे जिल्ह्यातील नागरिक, व्यापारी व उद्योजक हवाई प्रवासासाठी बेळगाव विमानतळाचा पसंती देत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. या संपूर्ण भागातील प्रवाशांना दिल्ली वगळता अन्य ठिकाणी जाण्यासाठी बेळगाव विमानतळावरील विमानसेवा सोयीचे ठरत आहे.

नवी दिल्लीला या भागातील विशेष करून संरक्षण दलातील लोक जात असतात. या मंडळींसाठी हैदराबाद मार्गे दिल्लीला जाणे सोयीचे ठरत असल्याने ते दिल्लीला जाण्यासाठी हैदराबाद विमानतळ पसंत करतात असे सांगून लॉक डाऊननंतर विमान सेवा पुनश्च सुरू झाल्यापासून 1 लाख 55 हजार 800 प्रवाशांनी बेळगाव विमानतळावरून प्रवास केला असल्याची माहिती राजेश कुमार मौर्य यांनी बेळगाव लाईव्हला दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.