एका बँकेच्या एटीएम मशीनमधून पैसे काढावयास गेलेल्या नागरिकांच्या हाती मशीनमधून बनावट तसेच बंदी घातलेल्या नोटा आल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी सकाळी अंबाभुवन जवळ घडला आणि कांही काळ एकच खळबळ उडाली.
अंबाभुवननजीक ललित बारखाली असलेल्या एका बँकेच्या एटीएममध्ये आज सकाळी पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांना एटीएममधून जुन्या चलनात नसलेल्या नोटांसह बनावट नोटा देखील बाहेर आल्याचे पाहून एकच धक्का बसला.
या प्रकारामुळे एटीएम परिसरात एकच खळबळ उडाली. पहिल्या नागरिकाला आलेल्या अनुभवाची शहानिशा करण्यासाठी इतर कांही जणांनी सदर एटीएम मशीनमधून पैसे काढले असता.
त्यांच्या हाती देखील बनावट नोटासह बंदी घातलेल्या नोटा आल्या. सदर प्रकार पाहून रांगेत उभे असलेल्या अनेकांनी अन्यत्र असलेल्या एटीएममधून पैसे काढणे सुरक्षित समजून तेथून काढता पाय घेतला.
दरम्यान, ज्यांना एटीएम मशीनमधून बनावट आणि चलनात नसलेल्या जुन्या नोटा मिळाल्या होत्या त्यांनी त्या नोटा घेऊन ते एटीएम ज्या बँकेचे आहे ती बँक गाठली. तसेच तेथील बँक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना घडल्या घटनेची माहिती देऊन बनावट आणि बंदी घातलेल्या नोटा बदलून देण्याची मागणी केली.
त्यानुसार सदर बँकेकडून संबंधितांच्या नोटा बदलून देण्यात आल्या. त्याचप्रमाणे अंबा भुवननजीकच्या संबंधित एटीएम मशीनमधील सर्व नोटा काढून त्या नव्या नोटा घालण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे समजते.