विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर ४ फेब्रुवारी पासून १५ फेब्रुवारीपर्यंत सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या भरती प्रक्रियेसाठी येणाऱ्या उमेदवारांची आरोग्य तपासणी, सुरक्षा आणि त्यांच्या निवासासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सूचना दिल्या. जिल्हाधिकारी सभागृहात शनिवारी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सैन्य भरती मेळाव्यासाठी आवश्यक त्या सर्व तयारी करण्यात यावी, याचप्रमाणे भरतीसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या मैदानावर आतील भागात आणि प्रवेशद्वारावर पोलीस विभाग आणि गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना तैनात करण्याविषयी सूचना देण्यात आल्या.
आरोग्य विभागाच्या वतीने थर्मल स्क्रीनिंग, मास्क, सॅनिटायझर आणि अँब्युलन्सची सुविधा तसेच मेळाव्यादिवशी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सक्तीने याठिकाणी उपस्थित राहावे, असेही जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले. बस आणि रेल्वेच्या माध्यमातून येणाऱ्या उमेदवारांसाठी बसची सोय करण्यात येण्यासंबंधी केएसआरटीसी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच उमेदवारांच्या निवासासाठी पिरनवाडी येथील कल्याण मंडपात सोय करण्यात येण्याविषयी बेळगाव उपविभागाधिकारी आणि तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या.
या भरती प्रक्रियेत दररोज ५००० उमेदवार सहभागी होणार आहेत. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्यासह मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात यावी, तसेच स्वच्छतेची जबाबदारी महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात यावी, यासाठी सूचना देण्यात आल्या.
भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवेशपत्र आणि दाखला तपासणी, हेस्कॉमच्या वतीने निरंतर वीजपुरवठा, भरती मेळाव्यादिवशी २४ तास अग्निशामक सेवा पुरविण्यात यावी, इच्छुक एनजीओंनी उमेदवारांसाठी फूड पॅकेट्सची व्यवस्था करण्यासंबंधी आवाहन करण्यात यावे, असे अधिकाऱ्यांना सुचविण्यात आले.