Friday, January 3, 2025

/

बेळगावची तरुणी विराजमान होणार लेफ्टनंट कर्नलपदी!

 belgaum

‘‘भारतीय लष्कराचे कामकाज महिलांच्या दृष्टिकोनातून विचार करता पारदर्शक, न्याय्य असून महिलांना तेथे कर्तृत्व दाखवण्याची संधी निश्चितच मिळते. लष्करी वेशात असतानाही प्रत्येक दिवस उत्साहात आनंदाने साजरा करा, अशक्य ते साध्य करण्याचे आव्हान तुम्ही स्वत:च स्वत:ला द्या. कधीही हार मानू नका. निम्मे जग तर महिलांचेच आहे, पण सेवेसाठी सगळे जग तुमच्यासाठी खुले आहे. त्यामुळे तुमच्यातील जे उत्तम असेल ते देशासाठी द्या.’’

हे बोल आहेत, मेजर स्नेहल काळंगे यांचे… ‘बेळगाव लाईव्ह’ने मेजर स्नेहल काळंगे यांच्या यशाबद्दल आणि त्यांच्या जिद्दीबद्दल जाणून घेतलेली माहिती –

बेळगावमधील जीएसएस महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या मेजर काळंगे यांची शालेय जीवनापासूनच सैन्यदलात भरती होण्याची अफाट इच्छा होती. मेजर काळंगे यांचे संपूर्ण कुटुंब लष्करात सेवा बजावीत असल्यामुळे लष्करी सेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. आई-वडिलांचा आदर्श घेऊन लष्करात उच्च पदावर विराजमान होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या स्नेहल काळंगे यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सैन्यदलात प्रवेश घेतला. एनसीसी मध्ये प्रवेश घेऊन सैन्यदलाचे धडे गिरविले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत पीजी डिप्लोमा इन सायकोलॉजीकल कौन्सिलिंग अँड गायडन्स, पीजी डिप्लोमा इन फॉरेन्सिक सायन्स अँड हॅन्डरायटिंग ऍनालिसिस यासारख्या अनेक क्षेत्राचे शिक्षण घेतले.

सहसा मुलींसाठी लष्करी क्षेत्र तितकेसे योग्य असल्याचे मानले जात नाही. परंतु यासर्व गोष्टींना फाटा देत तितक्याच ताकदीने काळंगे यांनी लष्करी सेवेचे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले. ओटीए (ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी) चेन्नई, येथे २००८ साली त्या प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या. गेली १३ वर्षे विविध ठिकाणी त्यांनी सेवा बजाविली आहे. पटियाला, रजौरी, बंगलोर, पानागड (वेस्ट बेंगॉल), भोपाळ अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांनी लष्करी सेवा बजाविली आहे.Major snehal

२०१६ मध्ये त्यांनी भोपाळ येथे GTO (Group Testing Officer) हा कोर्स पूर्ण केला असून आतापर्यंत त्यांनी १२०० हुन अधिक लष्करी अधिकाऱ्यांचे मूल्यांकन केले आहे. सहावे जनरल जे.जे. सिंग, १० मीटर एअर रायफल अशा अनेक नेमबाजीच्या स्पर्धांमध्ये यशस्वी सहभाग घेतला आहे. यासाठी त्यांना ब्रॉन्झपदक देखील मिळाले आहे. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे मेजर स्नेहल काळंगे यांना GOC-in-C NORTHERN COMMAND आणि GOC-in-C SOUTHERN COMMAND तर्फे त्यांना प्रशंसापत्रक देऊन गौरविण्यात आले आहे. या पदापर्यंत पोहोचण्याची महिलांची संख्या खूप कमी आहे. परंतु मेजर काळंगे यांनी आपल्या इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर इथपर्यंतचा प्रवास यशस्वीरीत्या पार केला आहे. सध्या त्या भटिंडा येथे सेवा बजावित असून पुढील वर्षी लेफ्टनंट कर्नल पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

भारतीय लष्करात आपले करियर करण्याचे एखाद्या स्त्रीचे स्वप्न पूर्ण होणे, हि खरंच प्रेरणादायी गोष्ट आहे. कारण हे करियर इतर करियरप्रमाणे नाही. यासाठी प्रचंड मेहनत, जिद्द आणि कुटुंबाचा विरह सहन करून स्वतःची ओळख निर्माण करण्याचं आव्हान पेलावं लागतं.

अनेक टप्पे पार करून उच्च पदावर पोहोचणं हे महाकठीण काम. परंतु आपली जिद्द आणि चिकाटी असेल, तर हे कठीण काम अगदी सहज शक्य होतं. शालेय जीवनापासून कोणत्याही खेळात आवड नसूनही त्या आता अनेक मॅरेथॉनमध्ये हिरीरीने सहभाग घेतात. प्रत्येक स्त्रीने स्वतःचे संरक्षण स्वतः करणे आणि कोणावरही अवलंबून न राहता आपल्या करियरकडे लक्ष केंद्रित करणे हे महत्वाचे असल्याचे त्या सांगतात.

स्वप्न ही केवळ बघण्यासाठी नसतात. आणि स्वप्न ही दुसऱ्यावर अवलंबून राहून पूर्णही करायची नसतात. ती स्वतःच्या हिमतीवर आणि स्वबळावर पूर्ण करायची असतात. यासाठी प्रत्येक स्त्रीने आपली जबाबदारी ओळखून हिमतीने पुढे जावे, असे त्या सांगतात. बेळगावचे नाव उच्च पातळीवर नेऊन चमकावणाऱ्या मेजर स्नेहल काळंगे यांना पुढील वाटचालीसाठी ‘बेळगाव लाईव्ह’तर्फे खूप साऱ्या शुभेच्छा!

-वसुधा कानूरकर सांबरेकर

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.