विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून जनतेची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकली असून, फसवणूक करणाऱ्या आरोपीला मार्केट पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावमध्ये विविध नावावर सुरु असलेल्या दुकानांवर धाड टाकून पोलिसांनी आरोपीला अटक केली. परंतु यातील एक आरोपी फरारी झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, .ट्रॅव्हल वर्ल्ड जॉब कन्सल्टन्सी आणि स्टॅंडर्ड ग्रुप शेट्टी गल्ली ऑफ एंटरप्राइजेस, दरबार गल्ली अशा नावावर सुरु असलेल्या दोन कंपन्या या जनतेकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक वसुली करत असत. विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना विश्वासात घेऊन फसवणूक करण्यात येत होती. यासंदर्भात पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही दुकानांवर छापा टाकत आरोपींना अटक केली.
इम्तियाज अस्तूपटेल यरगट्टी (वय ४०, रा. शाहूनगर बेळगाव) असे ट्रॅव्हल वल्ड जॉब कन्सल्टन्सी चालवणाऱ्याचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या कार्यालयातून तीन संगणक,1 लॅपटॉप,100 पॅम्प्लेट,15 व्हिजिटिंग कार्ड,1 फ्लेक्स बोर्ड,१ फॉलोअप शीट आणि नगरपालिका परवाना जप्त करण्यात आला आहे. तसेच दरबार गल्ली येथे स्टॅंडर्ड ग्रुप ऑफ कंपनी या नावाने सुरु असलेल्या दुकानावर देखील पोलिसांनी छापा टाकला.
मात्र आरोपी फरार झाला आहे. फरारी आरोपीचे नाव उमर फारूक अब्दुल हमीद (वय ३७, रा. कुंदापुर, उडुपी) असे आहे. या दुकानातून 5 लेटर पॅड,1 लाख 13 हजार रुपये रोख,१ मोबाईल संच,1 दुचाकी, बॉण्ड आणि तब्बल 314 पासपोर्ट जप्त करण्यात आले आहेत.
मार्केट पोलीस स्थानकाचे निरीक्षक संगमेष शिवयोगी आणि त्यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. याप्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.