Saturday, April 27, 2024

/

जि. पं. सर्वसाधारण बैठकीत गाजला येळ्ळूर पाणी मुद्दा

 belgaum

गेल्या दोन वर्षापूर्वी मंजूर होऊन देखील अद्याप कार्यरत न झालेल्या येळ्ळूर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी उठलेल्या जोरदार आवाजामुळे आजची बेळगाव जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक गाजली.

बेळगाव जिल्हा पंचायतीची सर्वसाधारण बैठक शुक्रवारी अध्यक्षा आशा एहोळे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीत अन्य विषयांच्या तुलनेत येळ्ळूर येथील प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचा विषय खऱ्या अर्थाने गाजला.

सदर प्रलंबित योजनेबाबत जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी आवाज उठवून संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले. परिणामी अधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली. अखेर जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी आज सायंकाळी तातडीने लोकप्रतिनिधीची भेट घेऊन यासंदर्भात सोक्षमोक्ष लावण्याचे आश्वासन दिले.

 belgaum

आजच्या बैठकीमध्ये आवाज उठविताना जि. पं. सदस्य रमेश गोरल यांनी येळ्ळूर येथील पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्णत्वास का गेले नाही? असा जाब विचारला तसेच दोन वर्षांपूर्वी एनआरडीडब्ल्यूपी या योजनेअंतर्गत मंजूर झालेली येळ्ळूरची पाणी पुरवठा योजना त्या नेत्याच्या हातचे बाहुले बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांमुळे प्रलंबित असल्याचा थेट आरोप केला. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला येळ्ळूर पाणीपुरवठा योजना कोणत्या साली मंजूर झाली? असा प्रश्न केला.Ramesh goral

त्यावेळी संबंधित अधिकाऱ्याला कोणतीच माहिती नसल्यामुळे त्यांची बोलती बंद झाली. त्यानंतर अधिकाऱ्याने सारवासारव करत लोकप्रतिनिधीचे नाव घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. तेंव्हा संतप्त झालेल्या गोरल यांनी प्रत्यक्ष जाऊन विकास कामे राबविणाऱ्या जिल्हा पंचायत सदस्याचे ऐकणार, सरकारचे काम करणार की त्या लोक प्रतिनिधींची खाजगी कामे करणार? असा सवाल केला

संबंधित आमदार येळ्ळूर येथील पाणी पुरवठा योजनेचे काम आपण कसे बंद पाडले हे सांगत फिरत असतात. मात्र सदर विकास काम आपण बंद पाडल्यामुळे येळ्ळूरवासियांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत आहेत याची त्यांना जाणीव नाही. अधिकारीवर्ग लोकप्रतिनिधीचे हातचे बाहुले झाले आहेत, असे सुचित करताना रमेश गोरले यांनी संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही आमदारांना घाबरत असाल तर ही सरकारी नोकरी सोडा आणि त्यांच्याकडे कामाला जा असेही स्पष्टपणे बजावले. त्याप्रमाणे येळ्ळूर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात यापुढे हयगय केल्यास तुमचे कार्यालय बंद पाडू असा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

जि. पं. सदस्य रमेश गोरल यांचा आक्रमक पवित्रा आणि योग्य भूमिका लक्षात घेऊन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी आज सायंकाळी त्या लोक प्रतिनिधीशी चर्चा करून येळ्ळूर पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले. जि. पं. सदस्य रमेश गोरल यांच्या प्रयत्नामुळे येळ्ळूर येथील पाणीपुरवठा योजना गेल्या 2019 -20 साली एनआरडीडब्ल्यूपी योजनेअंतर्गत मंजूर झाली होती. यासाठी एकूण 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून पहिल्या टप्प्यात 60 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.

सदर योजनेचे काम सुरु देखील झाले होते. पाईप व अन्य सामग्री येळ्ळूर येथे आणण्यात आली होती. मात्र माशी कोठे शिंकली माहित नाही सदर योजनेचे काम सुमारे वर्षभरापूर्वी थांबविण्यात आले आहे. सदर योजना कार्यान्वित झाल्यास येळ्ळूरवासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार आहे. दरम्यान, या योजनेचे श्रेय रमेश गोरल यांना मिळू नये यासाठी ही योजना प्रलंबित ठेवण्याचा खटाटोप त्या लोकप्रतिनिधीकडून केला जात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.