राज्याच्या नगर विकास खात्याचे मंत्री बी. ए. बसवराज आज बेळगावचा फेरफटका मारून स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या विकास कामांची पाहणी करणार आहेत.
नगर विकास मंत्री बी. ए. बसवराज आज दुपारी 3 वाजता बेळगावात दाखल होत आहेत. आपल्या बेळगाव भेटीप्रसंगी ते विविध विकास कामांची पाहणी करणार आहेत. केवळ दोन दिवसांच्या बेळगाव दौऱ्यावर येणारे नगर विकास मंत्री उद्या महापालिकेमध्ये विकास आढावा बैठक देखील घेणार असल्याची माहिती मनपा आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली आहे.
आज बेळगावात दाखल झाल्यानंतर नगर विकास मंत्री शहरात फेरफटका मारून स्मार्ट सिटी व महापालिकेच्या विकासकामांची पाहणी करतील.
मंत्री महोदय सर्वप्रथम दुपारी 3 वाजता एपीएमसी रोडवरील कमर्शियल कॉम्प्लेक्सला भेट देतील. त्यानंतर ते पौरकार्मिक वसतिगृह, त्याचप्रमाणे बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या विकास कामाची पाहणी करतील.
हालगा येथील एसटीपी प्रकल्पाच्या आणि केयुडब्ल्यूएसच्या कामाची देखील नगर विकास मंत्री बसवराज यांच्याकडून पाहणी केली जाणार आहे. याव्यतिरिक्त टिळकवाडी येथील कलामंदिरच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या बहुपयोगी संकुलाच्या बांधकामाची पाहणी केल्यानंतर मंत्री महोदय सराफ कॉलनी आणि पटवर्धन लेआऊट येथील उद्यानांना भेटी देऊन येथील विकास कामांवर नजर टाकतील. त्याच प्रमाणे ते अन्य विविध विकास कामांच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत.