स्टार एअर या आघाडीच्या प्रादेशिक विमान वाहतूक कंपनीने उडान योजनेअंतर्गत आपले प्रादेशिक संपर्काचे जाळे वाढविताना आज सोमवारपासून बेळगाव आणि नाशिक (महाराष्ट् दरम्यान थेट विमान सेवा सुरू केली आहे.
आजच्या 25 जानेवारी या दिवशी स्टार एअर कंपनी आपला दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी याच दिवशी स्टार एअरचे पहिले व्यावसायिक (कमर्शियल) विमान आकाशात झेपावले होते. यानिमित्त बेळगाव येथे स्टार एअरच्या शुभारंभाचा खाजगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील बड्या आसामींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संजय घोडावत ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नाशिक आणि बेळगाव यांच्यातील या हवाई संपर्कामुळे देशातील पहिले खाजगी एरोस्पेस सेझ (एसईझेड) असणाऱ्या बेळगावच्या प्रादेशिक एरोस्पेस क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. नाशिक हे भारताच्या संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्राशी संबंधित सामुग्री निर्मितीचे केंद्र आहे. या केंद्राला आवश्यक असणाऱ्या अभियांत्रिकी गरजांची बेळगाव अचूक पूर्तता करत असते.
बेळगाव -नाशिक या नव्या मार्गाबद्दल बोलताना स्टार एअरचे संचालक श्रेनिक घोडावत म्हणाले की, बेळगाव आणि हुबळी भागातील लोकांकडून घोडावत ग्रुप आणि स्टार एअरला प्रचंड प्रेम मिळाले आहे. बेळगावला देशातील जास्तीत जास्त शहरांशी जोडताना आम्हाला आनंद होत आहे. त्यामुळे प्रादेशिक संपर्क वाढण्याबरोबरच बेळगावच्या व्यापार आणि पर्यटन क्षेत्राला भरारी घेता येणार आहे.
नाशिक हे प्रामुख्याने शिर्डी व त्रंबकेश्वर या तीर्थस्थळांसाठी सुपरिचित आहे. स्टार एअरच्या विमान सेवेमुळे बेळगाव आणि परिसरातील लाखो भाविकांना महाराष्ट्राच्या या धार्मिक-अध्यात्मिक राजधानीला भेट देता येणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक आणि आसपासच्या भागातील पर्यटकांना कोल्हापूर, हुबळी आणि गोव्याला जाण्यासाठी बेळगाव सोयीचे ठरणार आहे.
संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी आपले विचार व्यक्त करताना उडान योजनेअंतर्गत जास्तीत जास्त शहरांना एकमेकांशी जोडताना आम्हाला आनंद होत आहे असे सांगून प्रवाशांकडून दिवसेंदिवस मिळणारा वाढता प्रतिसाद आम्हाला अधिक प्रोत्साहित करत आहे असे सांगितले.
स्टार एअरची बेळगाव -नाशिक विमान सेवा आठवड्यातील तीन दिवस सोमवार, शुक्रवार आणि रविवारी उपलब्ध असणार आहे. उडान -3 अंतर्गत सर्वसामान्य प्रवाशांना विमान प्रवास करता यावा यासाठी परवडणाऱ्या दरात तिकीट दर आकारण्यात येत आहे. कंपनीने 1,999 रुपये प्राथमिक तिकीट दर निश्चित केला आहे. प्रवाशांना अवघ्या तासाभरात नाशिकला पोहोचता येणार आहे. स्टार एअरच्या दररोज 26 विमान फेर्या होतात. आतापर्यंत 1.6 लाख प्रवाशांनी स्टार एअर विमान सेवेचा लाभ घेतला आहे.
https://www.facebook.com/375504746140458/posts/1311873532503570/