मुंबई कर्नाटकात समाविष्ट होणे अशक्य आहे. आणि बेळगाव महाराष्ट्रात समाविष्ट होणे अशक्य आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी सीमाप्रश्नावर भाष्य केले असून या गोष्टीला इतके महत्व देण्याची गरज नसल्याचे मत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. बेळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
बेळगाव हा कर्नाटकाचा अविभाज्य घटक आहे. कर्नाटकाने मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. तसेच माझ्या यमकनमर्डी मतदारसंघात सर्वाधिक मराठी भाषिक आहेत. तेथील जनतेला सर्वप्रकारच्या सुविधा देण्यात आल्या आहेत, असे जारकीहोळी म्हणाले. मुंबई कर्नाटकात समाविष्ट करावी, या लक्ष्मण सवदी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, कि मुंबई घेऊन आम्ही काय करू? आमच्यासाठी बंगळूर पुरेसे आहे.
अनेक गावांचा विकास करायचा आहे. सर्वप्रथम विकासाचे काम करू. मागील १० वर्षात रस्ते, पिण्याचे पाणी, कन्नड शाळांप्रमाणेच मराठी शाळांनादेखील प्राधान्य देण्यात आले आहे. अथणी पासून कारवारपर्यंत हजारो कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. कर्नाटक सरकारने देखील यासंदर्भातील लेखाजोखा पुस्तक स्वरूपात प्रकाशित करावा, आणि महाराष्ट्र सरकारला प्रत्त्युत्तर द्यावे असा सल्ला मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना दिला.
उद्या अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कोणतीही अपेक्षा नाही. आजपर्यंत त्यांनी निराशाजनक अर्थसंकल्प जनतेला दिला आहे. आता कोविडच्या नावाखाली बजेटमधील सकारात्मक गोष्टी या सर्व कमी केल्या जातील आणि राजकीय दृष्टिकोन ठेऊन केवळ योजनांचे आश्वासन जाहीर करण्यात येईल, अशी टीकाही त्यांनी केली.