जुने बेळगाव येथील वैद्यकीय कचरा प्रकल्प विरोधात लोकांच्या तक्रारी वाढल्यामुळे आणि तीन वेळा नोटीस देऊनही उत्तर देण्यात आले नसल्यामुळे महापालिका आरोग्य विभागाने या प्रकल्पाला टाळे ठोकले आहे.
जुने बेळगाव येथे असोसिएशन ऑफ मेडिकल एस्टॅब्लिशमेंटकडून वैद्यकीय कचरा प्रकल्प चालविण्यात येतो. या प्रकल्पात प्रमाणापेक्षा अधिक कचरा जाळण्यात येत असल्यामुळे परिसरात प्रदूषण वाढत असल्याचा आरोप स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. महापालिकेकडे देखील तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने कचरा डेपो प्रकल्प अधिकाऱ्यांना तीन वेळा नोटिसा दिल्या होत्या.
तथापि त्याला उत्तर देण्यात आलेले नाही असे कारण देत काल मंगळवारी महापालिका अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या नेतृत्वाखाली सदर वैद्यकीय कचरा प्रकल्पाला टाळे ठोकण्यात आले. यावेळी पर्यावरण अभियंते आदिलखान पठाण, महसूल निरीक्षक परशुराम मिस्त्री, आनंद पिंपरे, आरोग्य निरीक्षक सादिक धारवाडकर आदी उपस्थित होते.