खानापूर तालुक्यातील गोलीहळ्ळी परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली. हि माहिती समजताच अरण्य खात्याच्यावतीने या परिसराची पाहणी करण्यात आली. पारिश्वाड जवळ असणाऱ्या बीळकी, अवरोळ्ळी, कडतन बागेवाडी येथील गावात बिबट्याचे दर्शन झाल्याची माहिती मिळाली होती.
या परिसरात बिबट्या दिसून आल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. हि माहिती समजताच विभागीय अरण्याधिकारी श्रीनाथ कडोलकर आणि त्यांच्या सहकारी पथकाने या परिसरात भेट देण्याचे ठरविले. आणि या सर्व परिसरात तपासणी आणि पाहणी करण्यात आली.
बिबट्याच्या हालचाली तपासण्यासाठी संपूर्ण परिसरात या पथकाने पाहणी केली असून बिबट्याचे दर्शन झाल्यास आणि खात्री पटल्यास नागरिकांनी तात्काळ अरण्यखात्याला माहिती पोहोचवावी, तसेच दक्षता घ्यावी असे आवाहन अरण्यधिकाऱ्यांच्यावतीने करण्यात आले.
या परिसरात असणाऱ्या तलावाजवळ पाण्याच्या शोधात हा बिबट्या आला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. हा परिसर जंगलमय असून परिसरातील लोकांनी जागरूक राहावे, आणि दक्षता घ्यावी. शिवाय या भागात बिबटा असल्यासंबंधी कोणतीही खूण मिळाली नसून, परिसरातील जनतेला बिबटा असल्याचे आढळताच, खात्री करून अरण्य विभागाला कळवावे, असे आवाहन श्रीनाथ कडोलकर यांनी केले.