मागील दोन दिवसांमागे येळ्ळूर येथील राजहंसगडावर धिंगाणा घालणाऱ्या काही लोकांना दुर्गप्रेमींनी हुसकावले होते. राजहंसगड हा शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. छत्रपती शिवरायांच्या गडकोटांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या प्रत्येकाला शिवप्रेमींच्यावतीने चांगलीच समज देण्यात येते. परंतु बेळगावमधील अतिशहाण्या आणि अर्धवट ज्ञान असणाऱ्या काही कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांना याचे थोडेही भान नाही. धिंगाणा घालणाऱ्या युवकांनी आज माफीदेखील मागितली आहे. परंतु कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या मर्कटलीला पुन्हा सुरु झाला असून राजहंसगडावर जाऊन धिंगाला घातला आहे.
आज काही कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांनी गडावर हैदोस घातला असून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. गडावर लाल पिवळा घेऊन , कन्नडिगांवर विनाकारण हल्ला करणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू असा शड्डूदेखील या कार्यकर्त्यांनी दाखविला आहे. बेळगावमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी सतत मर्कटलीला करत बेळगावच्या जनतेला वेठीस धरू पाहणाऱ्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांसाठी हि काही नवी गोष्ट नाही. परंतु राजहंसगडावर धिंगाणा घालणाऱ्या युवक – युवतींना हुसकावण्यात आले आहे, यामागील कारण देखील या कन्नड कार्यकर्त्यांना माहित नाही.
गडकोट हे शिवप्रेमींच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. गडाचे पावित्र्य राखण्यासाठी शिवप्रेमींच्यावतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. आणि गडाचे पावित्र्य ज्यांच्याकडून जपण्यात येत नाही, त्यांना चांगलाच धडा शिकविण्यात येतो. मात्र हा धडा शिकविताना ती व्यक्ती कोणत्या धर्माची, जातीची, भाषेची आहे हे पाहून कारवाई करण्यात येत नाही. राजहंसगडावर झालेला प्रकार हा लज्जास्पदच आहे. परंतु या प्रकारानंतर कन्नड संघटनांनी सुरु केलेला हैदोस मात्र त्यांना नक्कीच महागात पडणार आहे.
या प्रकारानंतर कन्नड संघटनांनी लाल पिवळा गडावर घेऊन जाऊन ‘त्या’ युवकांवर केलेल्या कारवाईचा हिशोब करण्याचे तांडव केले. संगोळी रायन्ना, राणी चन्नम्मा यांच्या घोषणा दिल्या. त्यात कोणताही आक्षेप मराठी भाषिकांना नाही. परंतु छत्रपती शिवरायांची तत्वे, त्यांचे आदर्श आणि त्यांनी स्वराज्यासाठी केलेले अविस्मरणीय कार्य याचा लवलेशदेखील या कन्नड कार्यकर्त्यांना नाही. केवळ समाजात तेढ निर्माण करणे आणि कायदा हाती घेऊन शांतता बिघडविणे इतकेच काम या कन्नड संघटनांना येते. परंतु छत्रपती शिवरायांबद्दल अनादर राखणे आणि सातत्याने त्यांची विटंबना करणे हे आता मात्र कन्नड संघटनांना महागात पडू शकते.
मराठी जनता कायद्याने नक्कीच सर्व गोष्टींना सामोरी जाते. परंतु छत्रपती शिवरायांसंदर्भात कोणत्याही प्रकारचे अनावधान झाल्यास मराठी जनता कदापि गप्प बसणार नाही, याचे भान कन्नड संघटना आणि कार्यकर्त्यांनी आता राखणे गरजेचे आहे. छत्रपती शिवराय हे मराठी जनतेचे आराध्यदैवत आहेत. त्यांच्याविषयी कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्यात आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, हे कन्नड संघटनांनी लक्षात घ्यावे.