गेल्या 13 वर्षापासून निराधार असलेल्या आणि अलीकडे घरमालकाने घराबाहेर काढल्यामुळे रस्त्यावर आलेल्या एका असहाय्य वृद्ध महिलेला धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते व हेल्प फाॅर नीडीचे प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांनी काल आसरा मिळवून दिला.
याबाबतची माहिती अशी की, इंदिरा रामचंद्र पाटील या 65 वर्षीय महिलेला पतीच्या मृत्यूनंतर मुलगा आणि सुनेने 13 वर्षापूर्वी घराबाहेर काढले होते. त्यानंतर सदर महिला लोकांच्या घरी स्वयंपाकीण म्हणून काम करून आपला उदरनिर्वाह करत होती. भाड्याच्या घरात राहणार्या इंदिरा पाटील यांना अलीकडे संधिवाताचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांचे स्वयंपाक करण्याचे काम बंद झाले होते. त्यामुळे घराचे भाडे थकल्यामुळे घरमालकाने 8 दिवसांपूर्वी त्यांना घराबाहेर काढले होते. त्यानंतर त्या रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी आसरा शोधून दिवस कंठत होत्या.
असहाय्य इंदिरा पाटील यांच्या संदर्भात डॉ. पूजा पाटील यांनी हेल्प फाॅर नीडीचे संस्थापक प्रमुख सुरेंद्र अनगोळकर यांना माहिती देऊन संबंधित महिलेला मदत करण्याची विनंती केली. तेंव्हा अनगोळकर यांनी काल शुक्रवारी तात्काळ इंदिरा पाटील यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच सायंकाळी त्यांना जुने बेळगाव येथील सरकारी निवारा केंद्रात नेऊन दाखल केले. याबद्दल वृद्ध इंदिरा पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त करून सुरेंद्र अनगोळकर यांना दुवा दिला.
बेळगाव लाईव्हशी बोलताना सुरेंद्र अनगोळकर यांनी निराधार वृद्ध इंदिरा रामचंद्र पाटील यांच्याबद्दल माहिती दिली. त्याचप्रमाणे निवारा केंद्रांमध्ये त्यांची योग्य प्रकारे देखभाल केली जाईल याकडे आपण जातीने लक्ष देणार असून इंदिरा पाटील यांचा कपडेलत्ते आदींचा खर्च पाहणार असल्याचे सांगितले.