सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनने आपल्या सामाजिक कार्याचा विस्तार वाढविण्याताना आजपासून खानापूर तालुक्यासाठी हेल्प फॉर नीडी उपक्रमांतर्गत मोफत शववाहिका सेवा आणि फुड फॉर नीडी उपक्रमांतर्गत खानापूर हॉस्पिटल येथे मोफत भोजन व्यवस्था सुरू केली आहे.
खानापूर सरकारी हॉस्पिटल येथे आज सोमवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी शववाहिकेच्या किल्ल्या खानापूर येथील हेल्प फॉर निडी आणि फुड फॉर नीड उपक्रमाचे सर्वेसर्वा विवेक गिरी यांच्याकडे सुपूर्द केल्या. यावेळी बोलताना अनगोळकर यांनी आपल्या फाऊंडेशनतर्फे हेल्प फॉर निडी आणि फुड फॉर नीडच्या माध्यमातून बेळगाव येथे सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली.
याच माध्यमातून आता खानापुरातील गरीब गरजूंसाठी आपण मोफत शववाहिका आणि हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या अटेंडरसाठी सायंकाळी एक वेळ जेवणाची व्यवस्था करणार असल्याचे स्पष्ट केले.
सुरेंद्र अनगोळकर यांनी खानापूरसाठी हेल्प फॉर निडी आणि फुड फॉर नीड हे उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतल्याबद्दल विवेक गिरी यांनी त्यांना धन्यवाद दिले. तसेच खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील गरीब गरजू लोकांसाठी हे दोन्ही उपक्रम अत्यंत दिलासादायक ठरणार असल्याचे सांगितले. यावेळी मुरलीधर पाटील व इतरांनी समयोचित विचार व्यक्त करून सुरेंद्र अनगोळकर यांचे हे उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रकाश चव्हाण, एम. पी. पाटील, श्रीकांत दामले, आबासाहेब दळवी, बी. बी. पाटील, राजू रायका, अजीत पाटील, सागर पाटील, हरीभाऊ वाघधरे, जाॅर्डन गोन्सालविस, राजू परब आदी उपस्थित होते.