राज्यात अद्याप अधिकृतरीत्या बर्ड फ्लूचा शिरकावा झाला नसला तरी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तथापि शेतीला पूरक पोल्ट्री व्यवसायाला बर्ड फ्लूचा फटका बसला आहे. पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले असून त्यांचे आर्थिक गणित विस्कटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बेळगाव तालुक्यात 300 हून अधिक पोल्ट्री व्यावसायिक कार्यरत आहेत. त्यांच्याकडून लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायात करण्यात आली आहे. बँक आणि सोसायटींकडून कर्ज काढून अनेकांनी हा व्यवसाय थाटला आहे. बर्ड फ्लूच्या चर्चेमुळे खवय्यांनी जिभेला आवर घातल्यामुळे चिकन आणि अंडी यांच्या खपात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे दरही घसरले आहेत. चिकनचा दर प्रति किलो 50 ते 60 रुपये इतका गडगडला आहे.
पोल्ट्री व्यवसाय गावागावातून सुरू करण्यात आला आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक असलेल्या या व्यवसायासमोर सध्या अनेक अडचणी आहेत. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात सर्वाधिक फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला होता. हजारो पक्षी व्यवसायिकांनी खड्ड्यात गाडले, तर अनेकांनी फुकट वाटले होते. यामध्ये त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता पुन्हा बर्ड फ्लूची चर्चा सुरू झाल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक धास्तावले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूची लागण नसल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पशु संगोपन खाते आणि आरोग्य खात्याकडून जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव रोखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.